अस्वच्छता दूतांना दणका ः प्रशासनाची कारवाई : नऊ महिन्यांत सव्वा कोटींची वसुली
![A blow to the unsanitary messengers: Administration action: Recovery of Rs. 50 crores in nine months](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/PCMC.jpeg)
पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
रस्त्यावर घाण करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर शौच करणे, रस्त्यावर राडारोडा टाकणे, बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकणे, कचरा जाळणे, पाळीव प्राण्यांव्दारे अस्वच्छता करणा-यांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. त्याकरिता आठही क्षेत्रीय कार्यालयांसाठी ग्रीन मार्शल पथकांची नेमणूक करण्यात आली असून या पथकांच्यामार्फत महापालिकेला अवघ्या नऊ महिन्यांत तब्बल सव्वा कोटी रूपये मिळाले आहेत.
औद्योगिकनगरी, कामगारनगरीकडून स्मार्ट सिटी ते मेट्रो सिटीकडे शहराची वाटचाल होत असताना शहराची लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. शहरातील अनेक नागरिक स्वच्छतेचे नियम मोडत असल्याने पालिकेने दंडात्मक कारवाईचा बडगा हाती घेतला आहे. दंडात्मक कारवाईसाठी महापालिकेच्या वतीने आठही क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी एक ग्रीन मार्शल पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
या पथकांमार्फत गेल्या नऊ महिन्यात रस्त्यावर घाण करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर शौच करणे, रस्त्यावर राडारोड टाकणे, बायोमेडिकल वेस्ट उघड्यावर टाकणे,(PCMC News) कचरा जाळणे, पाळीव प्राण्यांव्दारे अस्वच्छता करणे यासह विविध नियम मोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईतून महापालिकेला तब्बल सव्वा कोटी रूपये मिळाले आहेत.
नागरिकांनी नियमांचे पालन करावे…
आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे म्हणाले, ”नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एका ग्रीन मार्शल पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांमार्फत नियम मोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या नऊ महिन्यांत या पथकाने सव्वा कोटी रूपयांचा दंड वसूल केला आहे. शहर स्वच्छ रहावे, यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे”.