स्वतःचे अपयश लपवण्यासाठी लादली पाणीकपात, राष्ट्रवादीचा आयुक्तांवर आरोप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/pcmc-main-2.jpg)
- कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांनी विचारला आयुक्तांना जाब
- 30 एमएलडी पाणी उपलब्ध करण्यासाठी कोणता निर्णय घेतला
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरासाठी 25 जानेवारीपर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा कायम ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दोन महिन्यांपूर्वी घेतला. तो कालावधी दोन दिवसांपूर्वी संपला, तरी प्रशासन दररोज पाणी पुरवठा करण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये. शहरासाठी 30 एमएलडी पाणी उपलब्ध करण्यात आलेले अपयश लपवण्यासाठी आयुक्त हर्डीकर यांनी नागरिकांवर पाणीकपात लादली आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे वाकडमधील कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांनी केला आहे.
यासंदर्भात कस्पटे यांनी आयुक्तांना रितसर निवेदन दिले आहे. त्यात आयुक्त आणि प्रशासनाच्या गलथान कारभारावर ताशेरे ओढले आहेत. कस्पटे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत दोन महिन्यासाठी म्हणजेच २५ जानेवारी २०२० पर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा केला. आता हा निर्णय यापुढे देखील कायम राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. जोपर्यंत ३० एमएलडी जादा पाणी मिळत नाही. तोपर्यंत एक दिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे कारण आयुक्तांनी सांगितले. परंतु, हा निर्णय जाहीर करताना आयुक्तांनी आपले अपयश सोयीस्करपणे लपवले आहे. कारण, ३० एमएलडी पाणी शहरवासियांना मिळण्यासाठी आयुक्तांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये कोणते प्रयत्न केले, कोणता ठोस निर्णय घेतला, असा सवाल कस्पटे यांनी विचारला आहे.
सल्लागार संस्था महापालिकेच्या जावई असल्यासारखे त्यांना पोसले जात आहेत. कोट्यवधी रुपये संस्था आणि ठेकेदारांना दिले जातात. त्यांनी दोन महिन्यात पाणीगळती व अनधिकृत नळजोड बंद करून पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी जी कामे केली, त्याचे स्पष्टीकरण आयुक्तांनी द्यावे. त्यानंतर ३० एमएलडीपैकी किती एमएलडी पाणी उपलब्ध केले, ते सांगावे. जर आरोपात खोट असेल तर २५ जानेवारी २०२० नंतर पाणीकपात का पूर्ववत केली जात आहे, हे सविस्तर सांगावे. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आज पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणा-या पवना धरणात ९० ते ९५ टक्के पाणीसाठा असताना शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची खंत आहे. नागरिकांपेक्षा ठेकेदार पोसायचे उद्योग सुरू आहेत, असा आरोपही कस्पटे यांनी केला आहे.
…अन्यथा एकाही टाकीतून पाणी सोडू देणार नाही
नागरिकांच्या प्रश्नांसाठी आयुक्तांकडे वेळ नसतो. २ जानेवारीपासून वेळ मागितली तरी आयुक्तांनी आजतागायत चर्चेसाठी वेळ दिलेली नाही. आमच्याकडून कसलाही फायदा होत नाही, हे माहित असल्यामुळेच आयुक्त चर्चेसाठी टाळाटाळ करत आहेत, असा स्पष्ट आरोप कस्पटे यांनी केला आहे. करदात्या नागरिकांप्रती थोडी जरी बांधीलकी वाटत असेल तर त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आयुक्तांनी कर्तव्यतत्परता दाखवावी. येत्या १५ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यता नागरिकांना घेऊन शहरातील एकाही पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होऊ देणार नाही. त्यानंतर होणा-या परिणामाला प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही कस्पटे यांनी दिला आहे.