सामाजिक सुरक्षा पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा
पिंपरी / महाईन्यूज
खुलेआम सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारून धरपकड केली. अड्डा चालविणा-या मालकासह जुगार खेळणा-या पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 1 लाख 22 हजारांचे साहित्य ताब्यात घेतले. ही कारवाई चिंचवडच्या बिजलीनगर येथे शुक्रवारी (दि. 6) करण्यात आली.
मटका अड्ड्याचा मालक कुणाल अडसुळ याच्यासह पाचजणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 56 हजार 960 रुपयांची रोकड, कल्याण मटका खेळण्याच्या चिठ्ठ्या, एक दुचाकी असा एकूण 1 लाख 22 हजार 170 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
चिंचवड रेल्वे स्टेशन परिसरात बिजलीनगर सर्वे नं. 63 याठिकाणी मटका अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मटका खेळण्यासाठी कोरोना काळातील नियमांचे उल्लंघन करून जमाव जमवला जात होता. पोलिसांनी याठिकाणी शुक्रवारी अचानक छापा टाकला. दरम्यान, जुगार अड्डा चालविणा-या अडसुळ याला आणि जुगार खेळणा-या चारजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.





