सर्वाधिक मिळकतकर भरला जातोय ऑनलाईन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/pcmc_2017082655.jpg)
पिंपरी : इंटरनेटचा मोफत व अमर्याद वापर, स्मार्ट मोबाईलमुळे ऑनलाईन खरेदीसोबत विविध बिलांचा भरणा काही सेकंदामध्ये केला जात आहे. ऑनलाईन पेमेंटची पद्धतही सुलभ व सुरक्षित असल्याने त्यास पसंती दिली जात आहे. प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहण्याचा त्रास आणि प्रवास खर्चातून सुटका होत आहे. वेळेची मर्यादा नसल्याने केव्हाही कोठूनही बिल भरल्याने दंडाऐवजी सवलतीचा लाभ मिळून आर्थिक बचतही होत आहे. नागरिकांच्या वाढत्या ऑनलाईन सवयीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीत मिळकतकर भरणा वाढून विक्रमी महसूल जमा होत आहे. त्याचा आलेख दिवसेदिवस वाढतच आहे.
महापालिका ऑनलाईन माध्यमातूनही मिळकतकर गोळा करते. त्यास सन एप्रिल 2009मध्ये सुरुवात झाली. पहिल्या वर्षी केवळ 3 हजार 835 नागरिकांनी ऑनलाईन माध्यमातून 2 कोटी 11 लाखांचा भरणा केला. एकूण रक्कमेपैकी ही रक्कम केवळ दोनच टक्के होती. दुसर्या वर्षी त्यात दुप्पटीने वाढ झाली. सन 2012-13 मध्ये हे प्रमाण 10.41 टक्कांवर पोहचले. तब्बल 28 हजार 966 जणांनी 30 कोटींचा भरणा केला. सन 2016-17 मध्ये त्यात मोठी वाढ होऊन ऑनलाईन कर भरण्याचे प्रमाण 21.79 टक्कांवर पोहचले. तब्बल 87 हजार 355 जणांनी 85 कोटी 17 लाखांचा भरणा केला.
गेल्या वर्षी म्हणजे 2017-18 या आर्थिक वर्षात त्यात आणखी वाढ होऊन ही संख्या 34.61 टक्कांवर पोहचली आहे. तब्बल 1 लाख 24 हजार 592 लोकांनी 145 कोटी 25 लाखांचा भरणा ऑनलाईन माध्यमातून केला. पालिका इतिहासामध्ये प्रथमच 100 कोटींचा आकडा ऑनलाईनने ओलांडला. गेल्या वर्षी एकूण 421 कोटींचा भरणा झाला. इतक्या अधिक रक्कमेचा भरणाही प्रथमच झाला आहे. एक एप्रिल ते 30 जूनपर्यंत ऑनलाईन भरणा केल्यास सामान्य करात 5 टक्के आणि त्यानंतर भरणा केल्यास 2 टक्के सवलत मिळते. त्याचा लाभ नागरिक घेत आहेत.