शास्तीकर माफ झाल्यास नागरिकांना ११८ कोटींचा द्यावा लागणार परतावा ?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/pcmc-building-4.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – राज्य सरकारने शास्तीकर माफीचा निर्णय घेत ६०० चौरस फुटांवरील बांधकामधारकांची शास्तीकरातून सुटका केली. तर, एक हजार चौरस फुटांपर्यंच्या बांधकामांना ५० टक्के माफी दिली. त्याचा शहरात ४८ हजार नागरिकांना लाभ होत असून १०१ कोटींची शास्ती करमाफी नागरिकांना मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेनंतर ६०० चौरस फुटांवरील बांधकामधारकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्याबरोबरच आजअखेर तब्बल ११८ कोटी रुपये शास्तीकरापोटी महापालिका तिजोरीत भरले. त्यांना राज्य शासन पुन्हा परतावा देणार का, हा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे.
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राज्य शासनाने जानेवारी २०१७ मध्ये शास्तीकर माफीचा अध्यादेश काढला. त्या अध्यादेशानुसार पिंपरी-चिंचवड शहरात एकूण ४८ हजार २४४ मिळकतींचे तब्बल १०१ कोटी रुपये माफ होत आहेत. त्यामध्ये ६०० चौ. फुटांपर्यंतच्या ३० हजार ९४ अनधिकृत मिळकती आहेत. त्यांच्याकडे एकूण ८० कोटी २६ लाख ६९ हजार ६६७ रुपये शास्तीकर थकीत होता. त्यांपैकी १७ हजार ७५० नागरिकांनी ३१ कोटी ८ लाख ४३ हजार ७९३ रुपये शास्तीकर भरला. उर्वरित ४९ कोटी ३० लाख ११ हजार २६५ थकीत शास्तीकरापासून या मिळकतधारकांची सुटका झाली.
दुसरीकडे ६०० ते १ हजार चौ. फुटांपर्यंतच्या एकूण १८ हजार १५० मिळकतधारकांना ५० टक्के माफी लागू आहे. त्यांचा एकूण ९९ कोटी ११ लाख ९७ हजार रुपये मिळकत कर आहे. त्यापैकी ६९ कोटी ३१ लाख १२ हजार रुपये थकबाकी आहे. शास्ती माफीनुसार या मिळकतधारकांचे ५१ कोटी ९८ लाख ४९ हजार ८६३ रुपये माफ होत आहेत. आतापर्यंत ९ हजार ९०३ मिळकतधारकांनी ३० कोटी ५ लाख १६ हजार रुपयांचा शास्तीकर भरला आहे. पूर्ण माफी किंवा माफीची मर्यादा ६०० वरून १ हजार किंवा २ हजार चौ. फुटांपर्यंत झाल्यास शास्तीकर भरणा करणाऱ्या नागरिकांना कर भरून चूक केल्याचा पश्चात्तापही सहन करावा लागणार आहे.