शहरातील मिळकतींचा वार्षिक मालमत्ता कर पूर्णपणे माफ करावा – महापौर माई ढोरे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/pcmc-5.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मिळकतींवर मालमत्ता कराची आकारणी करण्यात येते. शहरातील ५०० चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामांची नोंद असलेल्या मिळकतींचा सरसकट संपूर्ण वार्षिक मिळकत कर माफ करणेत यावा. ७०० चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामाची नोंद असलेल्या मिळकतींवर ६० % मिळकत कर आकारणी करुन उर्वरित ४० % वार्षिक मिळकत करामध्ये पूर्णपणे सवलत देण्यात यावी. संरक्षण दलाचे माजी सैनिक, शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नींच्या नावे असणा-या मिळकतींचा वार्षिक मालमत्ता कर पूर्णपणे माफ करावा, अशी सूचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी प्रशासनाला केली.
पिंपरी-चिंचवड ही औद्योगिक व कामगारनगरी असून अनेक गोरगरीब कामगार पिंपरी-चिंचवडमध्ये वास्तव्यास आहेत. कोरोना विषाणूचे संकट व लॉकडाऊनमुळे बरेच उद्योग, व्यवसाय हे पूर्वपदावर न आल्याने अनेक गोरगरीब कष्टकरी, कामगार व खाजगी नोकरदार वर्गास जीवन जगण्याची भ्रांत पडलेली आहे. सध्या शहरातील ब-याच नागरिकांना रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांची आर्थिक स्थिती अगोदरच खालावलेली आहे. त्यामध्ये भरीस भर म्हणजे महापालिकेमार्फत मिळकत धारकांना मिळकतकराची बिले देण्यात येत आहेत.
शहरातील सर्वच स्तरातील नागरिकांकडून वार्षिक मिळकत कर माफीसंबंधी मागणी करण्यात येत होती. तसेच संरक्षण दलाचे माजी सैनिक, शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नींच्या नावे शहरात जवळपास ३ हजार ५०० पेक्षा जास्त मिळकतीं आहेत. त्याची दखल घेऊन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी प्रशासनास सुचना केल्या आहेत.