व्यावसायिकांवर प्लास्टिक बंदी कारवाईचा बडगा; दिवसभरात 80 हजारांचा दंड वसूल
पिंपरी – सरकारने प्लास्टीक वापरावर बंदी घातल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने पहिल्याच दिवशी 115.1 कि. गॅ. प्लास्टीक जप्त करून संबंधितांना 80 हजारांचा दंड ठोठावला आहे. शनिवारी (दि. 13) दिवसभरात एकूण 16 व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे.
देशभरात सरकारने आजपासून प्लास्टीक बंदी लागू केली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील व्यापारी, दुकानदार आदी व्यावसायिकांवर महापालिकेच्या अधिका-यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दिवसभरात अ प्रभाग सोडला तर उर्वरीत सात क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ही कारवाई अधिक तिव्र करण्यात आली. अ क्षेत्रीय कार्यक्षेत्रात ही कारवाई करण्यात आली नाही. मात्र, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्लास्टिक बंदी कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत एकूण 16 व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे. तब्बल 115.1 कि. ग्रॅ. एवढे प्लास्टीक जप्त करण्यात आले. तर, 80 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सुट्टीच्या दिवशीही प्रशासनाने सतर्कता दाखविल्याने प्लास्टिक वापरणा-या व्यावसायिकांना जरब बसला आहे. 23 मार्च रोजी राज्य शासनाने प्लास्टिक बंदीची अधिसूचना जारी केली होती. त्यानंतर या वस्तूंचा साठा पूर्णपणे संपण्यासाठी 22 जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. ती मुदत काल संपली. शनिवारपासून प्लास्टिक बंदीचा निर्णय काटेकोरपणे घेण्यात येत आहे.
प्लास्टिकबंदीसाठी सरकारने दंडात्मक कारवाई निश्चित केली असून पहिल्यांदा प्लास्टिक आढळल्यास पाच हजार रुपये, दुस-यांदा आढळल्यास दहा हजार आणि तिस-यांदा प्लास्टिक आढळल्यास 25 हजार रुपये व तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने आजपासून आरोग्य विभागाने क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत आरोग्य निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली तपासणी पथके नेमली आहेत. या तपासणी पथकाकडून आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या अंतर्गत येणारी दुकाने, हॉटेल्स, तसेच इतर आस्थापनांची तपासणी केली जात आहे. आजअखेर 52 जणांवर कारवाई करण्यात आली असून अडीच लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.