‘विनामास्क’ फोटो काढल्याने राष्ट्रवादी नेत्यांवर कारवाई होणार का?

पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या भूमिकेकडे लक्ष
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहराचे नवनियुक्त पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती झाल्यानंतर राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनाचे पदाधिका-यांकडून त्यांची सदिच्छा भेट घेण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, सध्यस्थितीत शहरात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार वाढत चालला आहे. दररोज शेकडो रुग्ण पाॅझिटिव्ह येवू लागले आहे. त्या परस्थितीत प्रत्येकांने मास्क घालणे बंधनकारक केले आहे. विनामास्क फिरणा-यावर दंडात्मक कारवाई बडगा उगारला जात आहे. त्यातच पोलिस आयुक्तांबरोबर विनामास्क फोटो काढल्याने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांच्यासह अन्य पदाधिका-यांवर कारवाई होणार का? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
नवनियुक्त पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींनी विनामास्क फोटो काढला आहे. आता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार का? असा प्रश्न सामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घडली चूक मान्य केली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिका विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, पालिका ठेकेदार बिपीन नानेकरसह आणखी एकाने आज सदिच्छा भेट घेतली. तेव्हा हा फोटो काढण्यात आला.
पोलीस आयुक्त प्रकाश यांच्याशी संवाद साधताना या सर्वांनी मास्क घातलेला होता. पण आयर्नमॅन म्हणून ओळखले जाणारे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरला तर नाहीच पण यावेळी मास्क काढण्याची चूक या चौघांकडून घडली. तेव्हा पोलीस आयुक्त प्रकाश यांनी मात्र मास्क काढला नाही.
पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. पुणे शहरात तर पोलिसांनी आठवड्यातच एक कोटींचा दंड वसूल केला. अशात राष्ट्रवादीच्या लोकप्रतिनिधींना आणि ठेकेदारांना यातून सूट आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले की, ते दालनात मास्क घालूनच आले होते. संवाद साधताना ही मास्क होताच, फक्त फोटो काढताना मास्क नव्हता. त्यामुळे कारवाई करणे चुकीचे राहील. शिवाय मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश अद्याप पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वांचा समाचार घेणार
राष्ट्रवादीचे कारभारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पिंपरी-चिंचवडमधील जम्बो कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांना मास्क न घातल्यामुळे सर्व पदाधिका-यांच्या समोरच त्यांनी झापले होते. मास्क न लावता राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, अशा शब्दांत पवार यांनी चिखलेंचा समाचार घेतला होता. असे असताना राष्ट्रवादीचे शहरातील जबाबदार पदाधिकारी केवळ चमकोगिरीसाठी पोलिस आयुक्तांच्यासमोर विनामास्क फोटोसेशन करताना दिसत आहे. त्यांच्याकडून राज्य शासनाच्या कोविडसंबंधीत नियमांचे उल्लंघन झाल्याची बाब वरिष्ठ पातळीपर्यंत गेल्यास अजित पवारांनी त्यांना जाब विचारला तर विशेष वाटू नये.





