विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या रविवारी मुलाखती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/ncp_logo759.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – विधानसभेच्या पिंपरी, चिंचवड आणि भोसरी मतदार संघातील इच्छुक उमेदवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून रविवारी (दि. 28) मुलाखती घेण्यात येणार आहेत. पुण्यातील गुलटेकडी मार्केटयार्ड याठिकाणी निसर्ग मंगल कार्यालयात मुलाखत देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीने इच्छुकांना केले आहे.
आगामी विधानसभेच्या निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यानुसार सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांची तयारी जोरात सुरू आहे. राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी देखील निवडणुकीची तयारी केली आहे. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदार संघातील अनेक इच्छुकांनी पक्षाकडे तिकीटासाठी अर्ज केले आहेत. इच्छुक अर्जदारांना पक्षाकडून मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे. या मुलाखती रविवारी (दि. 28) होणार आहेत. पुण्यातील गुलटेकडी मार्केटयार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी आमदार विद्या चव्हाण, युवा नेते पार्थ पवार हे मुलाखती घेणार आहेत. इच्छूकांनी आपला बायोडाटा (संपूर्ण माहिती), मतदार संघातील कामाची फाईल आदी माहितीसह मुलाखतीला वेळेवर हजर रहाण्याचे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी चिंचवड विधानसभेतून माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे, मयुर कलाटे, विठ्ठल काटे, प्रशांत शितोळे, सतिश दरेकर यांनी अर्ज केले आहेत. पिंपरी विधानसभेतून ॲड. गोरक्ष लोखंडे, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत- धर, नगरसेवक राजू बनसोडे, संदीपान झोंबाडे, शेखर ओव्हाळ, सुनंदा काटे, गंगा धेंडे, माजी आमदार आण्णा बनसोडे, काळूराम पवार यांनी अर्ज केले आहेत. तर, भोसरीत मतदार संघातून माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, अजित गव्हाणे, जालिंदर शिंदे, दत्तात्रय जगताप, पंडीत गवळी यांनी अर्ज केले आहेत.