राष्ट्रीयकृत बँकाशिवाय पैसे ठेवता कामा नये, अन्यथा सरकार कारवाई करेल – उपमुख्यमंत्री अजित पवार
![Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/ajit-pawar-770x431-2.jpg)
महापालिकेचे पैसे काढण्यासाठी प्रयत्न करु, पण किती मिळतील हे माहिती नाही
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|
येस बॅंकेवर आरबीआयने निर्बंध घातल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेचे तब्बल 983 कोटी रुपये अडकले आहेत. आता ते कसे आणि किती मिळतील माहित नाही, परंतू, शासकीय व निमशासकीय संस्थाचा कोणताही निधी राष्ट्रीयकृत बँकाशिवाय दुसरीकडे ठेवता कामा नये. अन्यथा मी कारवाई करेल, असा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.
तळेगाव दाभाडे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज (शुक्रवारी दि.6) आले होते. त्यावेळी पिंपरी महापालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे करदात्यांचे दैनंदिन गोळा केलेले तब्बल 983 कोटी रुपये येस बँकेत अडकल्याचे त्यांना सांगितले.
याबाबत पवार म्हणाले की, येस बँकेविषयी अनेक गोष्टी ऐकायला मिळत आहेत. पिंपरी महापालिकेचे देखील एक हजार कोटीच्या आसपास बँकेत पैसे अडकल्याचे समजले. येस बॅंकेत भरलेले पैसे आता ते कसे आणि किती मिळतील. याकरिता प्रयत्न करावा लागेल.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या साक्षीने मंत्रीमंडळाच्या बैठकीत सर्वांना सांगितले आहे. राज्य सरकारचा, महामंडळाचा अथवा अन्य निमशासकीय संस्थाचा कोणताही निधी राष्ट्रीयकृत बँकाशिवाय दुसरीकडे ठेवता कामा नये. अन्यथा मी कारवाई करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. सध्यस्थितीत खासगी व सहकारी बॅंकाची आर्थिक स्थिती बिकट आहे. अनेक खासगी बँका बंद पडू लागल्या आहेत. त्यात शिवाजीराव भोसले बँक, रुपी बँक, रायगडमधील कर्नाळा बँक अडचणीत आली आहे. पंजाब महाराष्ट्र बँक देखील अडचणीत आली आहे. अशा प्रकारे बँका अडचणीत येत आहेत.