महाविकास आघाडीचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या !
![Mahavikas Aghadi's Social Justice Minister Dhananjay Munde resigns!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/उमा-२.jpg)
– भाजपा महिलाचा मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांची मागणी
– राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भाजपाचे निवेदन
पिंपरी | प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दोन पत्नी असल्याची कबुली दिली आहे. सोशल मीडियाद्वारे त्यांनी ही कबुली दिली. हे नियमबाह्य असून, जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी केली आहे.
तसेच, मंत्री मुंडे राजीनामा देणार नसतील, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी या वेळी उमा खापरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली.
निवेदनात नमूद केले आहे की, महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. रेणु शर्मा नावाच्या तरुणीने ब्लकमेल करून अनैसर्गिक कृत्य व अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली आहे. मंत्री मुंडे यांनीही सोशल मिडीयावर कबुली दिली आहे. करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत २००३ पासून परस्पर सहमतीने संबधात होतो अशी कबुली त्यांनी दिली. त्या महिलेच्या परस्पर सहमतीच्या संबधातून एक मुलगा व एक मुलगी झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच ही बाब कुटुंबियांना माहित असल्याचे त्यांनी सांगितले. त्या मुलांनाही मंत्री मुंडे यांनी दाखल्यावर नाव दिले आहे. कुटुंबीयांनी देखील हे स्वीकार केले असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.
बलात्काराचे आरोप असणाऱ्या बेजबाबदार व्यक्तीवर राज्याचे महत्वाचे पद देणे चुकीचे आहे. त्याचा समाजावर विपरीत परिणाम होतो. तसेच कायद्यातही दोन पत्नी असणे गुन्हा आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी उमा खापरे यांनी केली. अन्यथा भाजप महिला मोर्च्याच्या वतीने राज्यभर कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशाराही खापरे यांनी निवेदनाद्वारे दिला.