महाविकास आघाडीची अवस्था काविळ झालेल्या रुग्नाप्रमाणे – प्रविण दरेकर
![Mahavikas Aghadichi Status Kavle Jhalelya Rugnapramaye - Praveen Darekar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/darekar-2-1.jpg)
– केंद्रीय अर्थसंकल्पवरुन दरेकर यांची टिका
पिंपरी | प्रतिनिधी
कोरोना नंतरचा केंद्रीय अर्थसंकल्प हां सगळ्या घटकांना सामावून घेणारा तसेच नागरिकांचा आत्मविश्वास वाढविणारा मांडला आहे. मात्र तरीही विरोधक या वर टिका करत आहेत. ठराविक राज्यांनाच निधि दिला असल्याची टिका विरोधक करत आहेत. मात्र त्यांना काविळ झालेल्या रुगानाप्रमाणे सर्वच पिवळे दिसत आहे. सकारात्मक अर्थसंकल्प असूनही विरोधकांना सर्व नकारात्मक दिसत असल्याची टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यानी महाविकास आघाडीवर केली.
प्रवीण दरेकर यांनी सोमवारी पिंपरी-चिंचवड शहराला भेट दिली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही टिका केली. या वेळी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, माजी आमदार बाळा भेगडे यांच्यासह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
या वेळी दरेकर म्हणाले की, शिवसेनेच्या करणी आणि कथणीत फरक आहे. संभाजीनगरच्या बाबतीत आम्ही काही तडजोड करणार नाही, असे सांगतात. मग महापालिकेत त्यांची सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी महापालिकेत ठराव करावा कॅबिनेटचा निर्णय घ्या, केंद्र सरकारच्या मदतीची आवश्यकता लागल्यास आम्ही पुढाकार घेऊ. केवळ जाहीर करणे, घोषणा करणे यापेक्षा कृतीची आवश्यकता आहे. संभाजीनगर, असे नामकरणाची कृती करून दाखवावी, असे म्हणून प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर टिका केली.
भाजप सरकारच्या काळात त्रास झाला, असे वक्तव्य डाॅ. तात्याराव लहाने यांनी केले. त्याबाबत प्रवीण दरेकर म्हणाले, त्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती. राजकारणात सत्ताधारी किंवा विरोधक जाहीररित्या एकमेकांची उणीदुणी काढतात. त्याप्रमाणे प्रशासनातील, सरकारमधील उणीदुणी बाहेर काढणे शोभा देणारे नाही. अशाप्रकारचे वक्तव्य करणे योग्य नाही. लहाने यांनी चार भिंतींच्या आत बोलायला पाहिजे. लहाने यांना पद्मश्री पुरस्कार मिळावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला.
अण्णा हजारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला मान देत त्यांच्यावर विश्वास ठेवून केंद्र सरकारविरोधातील आंदोलन स्थगित केले. असे असताना संजय राऊत यांच्या पोटात दुखले नाही तर कसे चालेल, असा प्रश्न उपस्थित करून प्रवीण दरेकर यांनी राऊत यांच्यावर तोफ डागली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे भाजप नेत्यांकडून त्यांची मनधरणी सुरू होती. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली.
हजारे यांनी आंदोलन स्थगित केले. त्यानंतर ‘सामना’तून अण्णा यांच्या या भूमिकेवर तिरकस भाष्य करण्यात आले. याबाबत दरेकर म्हणाले, अण्णांनी देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला मान देऊन आंदोलन मागे घेतले. त्यामुळे राऊतांच्या पोटात दुखले नाही तर कसे चालेल? अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वार्थ साधता आला तर आला, असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या दुर्दैवाने हा स्वार्थ साधता येत नाही. त्यामुळे ‘सामना’च्या अग्रलेखातून कुठल्यातरी निमित्ताने टिका केली जाते.