महापालिकेतील ‘खुर्ची बहाद्दरां’ ना दणका ; प्रशासनात उद्यापासून अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्यांचा धडाका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/pcmc_2017082655-2.jpg)
प्रशासन उद्या काढणार आदेश ः वर्ग 1 ते 3 कर्मचा-यांच्या होणार बदल्या
पिंपरी – महापालिका मुख्य इमारतीत व क्षेत्रीय कार्यालयात एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याकरिता महापालिका प्रशासन विभागाने सर्व विभागाकडून माहिती संकलित केली होती. त्यामुळे तीन व सहा वर्षापेक्षा अधिककाळ झालेल्या अधिका-यांच्या बदल्या केल्या असून त्यासंदर्भात फायलीवर आयुक्तांनी सह्या केल्या आहेत. त्यांचे आदेश उद्या (शुक्रवारी) काढण्यात येणार आहेत.
पिंपरी -चिंचवड महापालिका आस्थापनेवर काम करणा-या वर्ग 1 ते 4 मधील अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या करण्यात येत आहेत. स्थानिक राजकीय नेत्यांच्या आश्रयाने वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या अधिकारी व कर्मचा-यांची तत्काळ उचलबांगडी करण्यात येणार आहे. अनेकांनी स्वतःचे खासगी व्यवसाय सांभाळून महापालिकेचे कामकाज पाहात आहेत. तर राजकीय आश्रय लाभलेले काही कर्मचारी महापालिकेत सकाळी थम्ब इंप्रेशन करुन दिवसभर गायब असतात. त्यानंतर घरी जाण्यासाठी महापालिकेकडे फिरत असल्याची चर्चा आहे. या कर्मचा-यांवर कारवाई करण्याकडे त्या-त्या विभाग प्रमुखाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
महापालिका आयुक्तांनी प्रशासन विभाग प्रमुखांना सक्त सुचना देवून महापालिकेतील तीन व सहा वर्षापेक्षा जास्त काळ सेवा केलेल्यांची यादी तयार करण्यास सांगितले होते. त्या अधिकारी व कर्मचा-यांच्या बदली राजकीय दबावापुढे न झुकता करण्यात येणार आहेत. वैद्यकीय आजाराच्या कारणास्तव एखाद्याला विनंती अर्जावरुन त्या अधिकारी व कर्मचा-यांच्या बदलीला स्थगिती देण्यात येणार आहे. अन्यथा ज्यांचा सेवा कालावधी पुर्ण झाला आहे. त्यांची कोणतीही हयगय न करता सरसकट बदल्या करण्यात येणार आहेत. त्यामुळे उद्यापासून महापालिकेत अधिकारी व कर्मचा-यांच्या बदल्यांचा धडाका उडणार आहे.
दरम्यान, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेतील सुमारे शंभर ते दीडशे अधिकारी व कर्मचा-यांच्या बदलीच्या फायलीवर सह्या केल्या आहेत. त्या अधिकारी व कर्मचा-यांच्या लवकरच बदली आदेश महापालिका प्रशासन विभागाकडून काढण्यात येणार आहे. अशी माहिती प्रशासन विभागातील अधिका-यांनी दिली.