महापालिका आयुक्तांच्या बदलीचे श्रेय घेण्यासाठी नेत्यांची धडपड!
![Leaders struggle to get credit for transfer of Municipal Commissioner!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/shravan-hardikar-pcmc.jpg)
- खासदार, आमदारांकडून राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न
- महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांची बदली निश्चित
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांची लवकरच बदली होणार आहे. मात्र, त्याचा राजकीय फायदा उठवण्यासाठी शहरातील आमदार आणि खासदारांकडून आयुक्त हर्डिकरांना टीकेचे लक्ष केले जात आहे, अशी चर्चा महापालिका वर्तुळात सुरु आहे.
आयुक्त हर्डिकर यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांची बदली होणार होती. मात्र, राज्य शासनाने त्यांना पदोन्नती देत काहीकाळ आहेत्याच ठिकाणी काम करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, खासदार श्रीरंग बारणे, मध्यंतरी खासदार अमोल कोल्हे त्यापूर्वी आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्त हर्डिकर यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली होती. वास्तविक, वादग्रस्त निविदांवर स्वाक्षरी करण्यासाठी आयुक्तांनी नकार दिल्यामुळे लोकप्रतिनिधींच्या टीकेचे धनी आयुक्त होत आहेत, असा सूर अधिकाऱ्यांमधून आहे. दुसरीकडे, बदलीबाबत निश्चितीचे संकेत मिळाल्यामुळे आयुक्त हर्डिकर सध्या दीर्घ रजेवर गेल्याचेही बोलले जात आहे.
महाविकास आघाडीने चौकशी करावी…
खासदार बारणे यांच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आहे. खासदार अमोल कोल्हे यांचा पक्षही सत्तेत आहे. आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्या चुकीच्या कामांची यादी त्यांच्याकडे आहे. मग, राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात एकाही कामाची चौकशी का लावली नाही? असा सवाल पिंपरी-चिंचवडकरांना पडला आहे.
स्मार्ट सिटीत शिवसेना सदस्य नाहीत का?
शिवसेना शहराध्यक्ष योगेश बाबर, संघटिका सुलभा उबाळे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये स्मार्ट सिटीतील कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे अनेकदा जाहीरपणे म्हटले आहे. मात्र, स्मार्ट सिटी संचालक मंडळामध्ये शिवसेनेचा सदस्य आहेत. त्यांनी याबाबत आजवर कधीही आक्षेप घेतलेला दिसत नाही. दुसरीकडे, स्मार्ट सिटी किंवा शहरातील कोणत्याही कामांमध्ये अनियमितता झाली असेल, तर राज्य सरकारमध्ये असलेली शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेसही चौकशी लावून सत्य बाहेर का आणत नाही? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.