महागड्या शाळेतील शिक्षण चांगले हा पालकांचा गैरसमज – प्रकाश जावडेकर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/prakashjavadekar-kx-1.jpg)
- जयहिंद हायस्कूलच्या नूतन इमारतीचे जावडेकर यांच्या हस्ते उदघाटन
महागड्या शाळेतील शिक्षण चांगले हा पालकांचा गैरसमज आहे. शासकीय शाळांमध्येही उत्तम पद्धतीचे, गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळते आणि त्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे, असे मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. तसेच समाज बांधणीसाठी, देश पुढे नेण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. पण, आजकाल शाळांमध्ये शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे शोषण केले जाते. हल्लीच्या शिक्षणसंस्था म्हणजे, नफा कमविण्याच्या जागा बनल्या आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
पिंपरीतील जय हिंद सिंधू एज्यूकेशन ट्रस्ट संचलित जयहिंद हायस्कूलच्या नूतन इमारतीचे उदघाटन आज (शुक्रवारी) जावडेकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, ट्रस्टच्या विश्वस्त अध्यक्षा नलिनी गेरा, माजी खासदार गजानन बाबर, आमदार लक्ष्मण जगताप, मुख्याध्यापिका ज्योती मलकानी उपस्थित होते.
स्त्री शिक्षणाची सुरूवात पुण्यातच झाली. महर्षि धोंडो केशव कर्वे, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी त्यासाठी खस्ता खाल्या असे सांगत जावडेकर म्हणाले, “गेली शेकडो वर्षे स्त्रियांमधील उर्जा, ताकद याचा आपण उपयोगच करून घेतला नाही. स्त्रीमध्ये वात्सल्य, कामातील सातत्य आणि धाडस हे असे गुण आहेत, जे देश बांधणी, समाजासाठी उपयुक्त आहेत. ’जय हिंद सिंधू एज्यूकेशन ट्रस्ट’च्या माध्यमातून महिलाच कारभार पाहतात, ही अभिनंदनीय बाब आहे”
“पुस्तकातील शिक्षकांनी शिकविलेले ज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे. तर संवाद, संभाषण आणि समजून घेणे याला शिक्षण म्हणतात. आपला मेंदू म्हणजे माहितीचा खजिना गोळा करणारी ‘हार्डडिस्क’ नाही. त्यामुळे मुलांच्या पाठीवरील शिक्षणाचे आणि त्यांच्या मेंदूवरील तणावाचे ओझे कमी करा”असे आवाहनही त्यांनी केले.
गिरीश बापट म्हणाले, “शाळेला आपण मंदिर म्हणतो, त्यामुळे शिक्षणाचे हे मंदिरहही स्वच्छ, सुंदर आणि दर्जेदार असले पाहिजे