भाजप-सेना युती न झाल्यास निवडणुकीतून खासदार बारणेंची माघार?

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची चाचपणी केल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे हमखास निवडून येऊ शकतात, याची शक्यता धूसर होऊ लागली आहे. त्यातच भाजप-सेना युती न झाल्यास लोकसभा निवडणुकीतून खासदार बारणे माघार घेऊ शकतात, असा निष्कर्ष प्राब या संस्थेने वर्तविला आहे. दरम्यान, युती न झाल्यास खासदार बारणे निवडणूक लढण्यास उत्सुक नसल्याचीही चर्चा मावळ मतदार संघात सुरू आहे. त्यामुळे खासदार बारणे यांच्या हालचालींकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना-भाजपच्या युतीचा निर्णय काही दिवसांपासून प्रलंबित आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेला अल्टिमेटम दिला आहे. युतीबाबत लवकर निर्णय घ्या, अन्यथा दोन्ही निवडणुकांना एकत्रित सामोरे जा, असा इशारा भाजपने शिवसेनेला दिला असल्याने याबाबत लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. भाजप-सेना युती झाल्यास खासदार श्रीरंग बारणे यांना राजकीयदृष्ट्या निश्चितच दिलासा मिळेल. खासदार श्रीरंग बारणे यांनी रविवारी (दि. २१) आकुर्डीत झालेल्या कार्यक्रमात “लोकसभा निवडणुकीत भाजपच्या निष्ठावंतानी माझे काम केले, पण आज त्या कार्यकर्त्यांवर अतिक्रमण झाले आहे”, अशी टिका केली होती. या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले की, खासदारकीची लॉटरी लागलेले मावळचे निष्क्रिय खासदार श्रीरंग बारणे यांना महापालिका निवडणुकीत शहरातील जनतेनेच फटकारले होते. शिवसेनेची पूर्ण वाट लावलेल्या बारणे यांनी घरातली माणसे सोडल्यास एक सुद्धा शिवसैनिक मोठा केला नाही. आता बारणे भाजपमध्ये दुही माजवून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचे दिवास्वप्न पाहत आहेत. भाजपबद्दल एवढेच प्रेम होते, तर त्यांनी गेल्या साडेचार वर्षांत भाजपच्या एकातरी कार्यकर्त्याला केंद्राच्या समितीवर किंवा इतर ठिकाणी संधी देणे गरजेचे होते. येत्या निवडणुकीत बारणे यांना कायमचे घरी बसावे लागेल, असा पलटवार आमदार जगताप यांनी केला आहे. यामुळे दोघांमध्ये प्रतिष्ठेचा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघात पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड, पिंपरी या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यापैकी पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये प्रशांत ठाकूर, मावळात बाळा भेगडे, चिंचवडला लक्ष्मण जगताप हे भाजपचे आमदार निवडून आले आहेत. तर, कर्जतला राष्ट्रवादीचे सुरेश लाड, उरण व पिंपरीत सेनेचे अनुक्रमे मनोहर भोईर व गौतम चाबुकस्वार निवडून आले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड महापालिका, पनवेल, लोणावळा, तळेगाव नगरपरिषद अशी महत्त्वाची सत्तास्थाने भाजपाच्या हातात आहेत. या मतदारसंघातील सेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे काम चांगले आहे. सलग तीनदा त्यांना संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे; मात्र या मतदारसंघात भाजपची वाढलेली ताकद ही खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी धोकादायक आहे, म्हणून भाजप-सेना युती झाल्यास खासदार बारणे यांचा विजय सुकर होउ शकतो. भाजप-सेना युती न झाल्यास विजयाची शाश्वती नसल्याने आर्थिकदृष्ट्या व राजकीयदृष्ट्या हानिकारक ठरेल, या शक्यतेने खासदार बारणे निवडणुकीची जोखीम पत्करण्यास धजावणार नाहीत, असा अंदाज पुण्यातील पॉलिटिकल रिसर्च अण्ड अनॅलिसीस ब्युरो (प्राब) संस्थेने वर्तविला आहे.
याबाबत खासदार बारणे म्हणाले की, मतदार संघात माझे काम चांगले आहे. दररोज तेरा-चौदा तास मी काम करत आहे. लोकांच्या गाठी-भेटी घेत आहे. त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. गेल्या साडेचार वर्षामधील माजे काम पाहून उध्दव साहेबांनी माझी उमेदवारी निश्चित केली आहे. युती होओ अथवा न होओ मी निवडणूक लढणार आहे. आता माझ्यापुढे स्वतःला प्रतिस्पर्धक समजणा-यांना माझी भिती वाटू लागली आहे. त्यांनी पैसे देऊन अशा बातम्या पेरण्याचा उद्योग केला आहे. त्यामुळे ही बातमी अत्यंत खोटी आहे. समाजात माझ्याविषयी समज गैरसमज निर्माण करण्याचे षडयंत्र आहे. संबंधीत एजन्सी खोट्या व चुकीच्या पध्दतीने बातम्या पेरण्याचे काम करत असेल, त्यामुळे अशा बातम्यांवर लोकांनी विश्वास ठेवू नये.





