Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
बुलढाणा : शहीद जवानांच्या कुटुंबियांना मराठवाडा जनविकास संघाची मदत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/IMG-20190401-WA0035.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या बुलढाण्यातील दोन जवानांच्या कुटुंबियांना पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ आणि विजयराज नागरी सहकारी पतसंस्था यांच्यातर्फे प्रत्येकी 51 हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.
पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिं. चिं. शहर, विजयराज नागरी सहकारी पतसंस्था पिंपळे गुरव आणि लेवा भ्रातृ मंडळ, पिंपळे सौदागर यांच्या संयुक्तपणे मलकापूर (जि. बुलढाणा) येथील जनता कला-वाणिज्य महाविद्यालयात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहीद जवान संजयसिंह राजपूत व नितीन राठोड यांच्या वीरपत्नी, वीरमाता आणि कुटुंबातील सदस्य, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, दत्तात्रय धोंडगे, सूर्यकांत कुरुलकर, मराठवाडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश इंगोले, मारुती बाणेवार, लेवा भ्रातृ मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पिंपळे, कार्याध्यक्ष क्रुष्णाजी खडसे, अमित नाफडे, मलकापूरचे नगराध्यक्ष ऍड. हरीष रावल, दिलीप बढे, बळीराम माळी, डॉ. दिनेश गाडेकर, विजय वडमारे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. शहीद जवान संजयसिंह राजपूत व नितीन राठोड नितीन राठोड हे ज्या शाळा व महाविद्यालयात शिकले, त्या अनुक्रमे जनता कला व वाणिज्य महाविद्यालय आणि नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांना ‘सैनिकी शिक्षण आणि त्याद्वारे उपलब्ध करिअरच्या संधी’ याबाबत कृष्णाजी खडसे यांनी, तर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करिअरच्या संधीबाबत दीपस्तंभ फाऊंडेशनचे संचालक संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शहीद संजयसिंह राजपूत यांचे सुपुत्र जय राजपूत यांनी ‘माझ्या भारतमातेचे रक्षण करण्यासाठी मी देखील सैन्यातच भरती होणार असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.