‘फेकू सरकारचं करायचं काय’, ‘खाली डोकं वर पाय’; राष्ट्रवादी आक्रमक (पहा व्हिडिओ)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/IMG-20190110-WA0003.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिखली येथे होणा-या संतपीठाच्या कामात भ्रष्टाचार होणार आहे. इमारतीच्या निविदेत पाच कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड युवक कॉंग्रेसच्या वतीने महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाच्या विरोधात सुप्रीम चौकात आज गुरूवारी (दि. 10) टाळ-मृदंग वाजवून आंदोलन करण्यात आले. यावेळी पालिकेतील सत्ताधारी भाजपसह आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या ‘आयुक्ताचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’, ‘फेकू सरकारचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’, अशा घोषणा देऊन निषेध करण्यात आला.
संतपीठाच्या समितीमध्ये सांप्रदायीक व संत परंपरेची जाण असलेल्या व्यक्तींची नेमणूक करण्याचा ठराव राष्ट्रवादीच्या कार्यकाळात केला होता. त्यातील तज्ञांची नावे वगळून सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांनी त्यांच्या सोयीनुसार काही लोकांची नावे त्यात समाविष्ठ केली आहेत. त्यातच संतपीठाची भव्य वास्तू उभारण्यासाठी पालिका प्रशासनाने निविदा काढली. त्यातही भ्रष्टाचार केल्याचा आरोप युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी केला. अध्यात्मिक क्षेत्राला सुध्दा सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी भ्रष्टाचाराचा कलंक लावीत आहेत. सर्वसामान्य लोकांनी पालिकेत कर रुपाने भरलेल्या पैशांची अशा पध्दतीने विल्हेवाट लावली जात आहे. वाढीव खर्चाच्या या निविदेत भ्रष्टाचार झाला आहे. अशा चुकीच्या कामासा राष्ट्रवादी कदापी पाठीशी घालणार नाही, असेही वाकडकर म्हणाले.
यावेळी आंदोलकांनी सत्ताधारी भाजप आणि पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. या ‘सत्ताधा-यांचं करायचं काय, खाली डोकं वर पाय’, ‘आयुक्तांचे करायचे काय, खाली डोकं वर पाय’, अशा घोषणा देऊन सत्ताधा-यांच्या भ्रष्टाचारी भूमिकेचा निषेध करण्यात आला.