पुणे-लोणावळा लोकल सर्व सामान्यांसाठी तत्काळ सुरु करा
![Start Pune-Lonavla local for all commuters immediately](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/photo-01.jpg)
- खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे मागणी
पिंपरी |महाईन्यूज|
पुणे-लोणावळा असलेली लोकल रेल्वे सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी तात्काळ पूर्ण क्षमतेने सुरु करावी, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन खासदार बारणे यांनी निवेदन दिले आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात बारणे यांनी म्हटले आहे की, कोरोनामुळे मार्च महिन्यापासून देशातील सर्व रेल्वेसेवा बंद केली होती. राजधानी, एक्सप्रेस रेल्वे, माल वाहतूक करणाऱ्या रेल्वे बंद केल्या होत्या. सध्या देशभरात काही विशेष रेल्वे सुरू आहेत. मुंबईत सरकारी कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यासाठी लोकल रेल्वे सेवा सुरू केली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात लोणावळा ते पुणे लोकल रेल्वे सेवा केली आहे. पण, फेऱ्या कमी आहेत. दिवसभरात केवळ चारच फेऱ्या होत आहेत. मावळ भागातून अनेक सरकारी कर्मचारी पुणे, मुंबईत नोकरीसाठी जातात. लोकच्या फेऱ्या कमी असल्याने कर्मचाऱ्यांना कार्यालयात जाण्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे लोणावळा पुणे दरम्यान धावणाऱ्या लोकल रेल्वे सेवेच्या फेऱ्या वाढवाव्यात. जेणेकरून सरकारी कर्मचारी कार्यालयात वेळेवर पोहचतील. जनतेची कामे आणि देशाची सेवा करतील.
या भागातील अनेक नागरिक पुणे, मुंबईत खासगी नोकरीसाठी जातात. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये जाण्यासाठी पीएमपीएमएल बसमध्ये मोठी गर्दी असते. सुरक्षित अंतराचे पालन होत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांकरिता देखील रेल्वेतून प्रवासाची मुभा द्यावी, अशी विनंती खासदार बारणे यांनी केली आहे.