पिंपरी-चिंचवड भाजपाला धक्का : नगरसेविका माया बारणे यांचा शिक्षण समिती सदस्यपदाचा राजीनामा!
![Pimpri-Chinchwad BJP shocked: Corporator Maya Barne resigns as Education Committee member!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/पिंपरी-चिंचवड-भाजपाला-धक्का-_-नगरसेविका-माया-बारणे-यांचा-शिक्षण-समिती-सदस्यपदाचा-राजीनामा.jpg)
- पक्षश्रेष्ठींनी मानाच्या पदावर संधी न दिल्याने नाराजी
- निवडणुकीच्या पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची चर्चा
पिंपरी । अधिकराव दिवे-पाटील
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपामध्ये नाराज नगरसेवकांची संख्या वाढली आहे. पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी ‘शब्द’ दिला असतानाही महत्त्वाच्या पदांवर संधी दिली नाही, असा आक्षेप घेत नगरसेविका माया बारणे यांनी शिक्षण समिती सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.
महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्याकडे बारणे यांनी राजीनामा सोपवला असून, पक्षाकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे, माया बारणे यांनी महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे बारणे यांच्या रुपाने पिंपरी-चिंचवड भाजपाला पहिला धक्का बसणार आहे.
२०१७ मध्ये महापालिकेत सत्ता मिळाल्यानंतर ‘एक पद- एक नगरसेवक’ असे सूत्र अवलंबून प्रत्येक नगरसेवकाला पदवाटपात समान संधी दिली जाईल, अशी भूमिका भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी घेतली होती. मात्र, पक्षातील २५ ते ३० टक्के नगरसेवकांना पदवाटपात डावलण्यात आले आहे. परिणामी, अनेकजण नाराज असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पर्यायायाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आहेत.
संतोष बारणे यांनी दिले होते संकेत…
२०२२ मध्ये महापालिका निवडणूक होणार आहे. तत्त्पूर्वी भाजपामधील नाराज नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपर्कात आहेत. नगरसेविका माया बारणे यांचे पती संतोष बारणे यांनी मध्यंतरी श्री. पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर शास्ती थकबाकी वगळून मूळ मिळकतकर भरण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आभाराचे फ्लेक्स संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदार संघामध्ये लावले होते.
पक्षश्रेष्ठींकडून उडवा-उडवीची उत्तरे…
नगरसेविका माया बारणे म्हणाल्या की, महापालिकेत भाजपा सत्तेत आल्यानंतर पक्षश्रेष्ठींनी महापौरपदी संधी देवू, असे आश्वासन दिले होते. मात्र, मला शहर सुधारणा समितीवर काम करण्यास सांगीतले. या समितीच्या एकाही बैठकीला मी उपस्थित राहीले नाही. त्यानंतर मला शिक्षण समितीवर काम करण्यास सांगीतले. वास्तविक, गेली १५ वर्षे आम्ही महापालिकेत काम करीत आहोत. भाजपातील पक्षश्रेष्ठींसाठी आम्ही बारणे कुटुंबियांच्या विरोधात जावून पक्षाचे काम केले. संपूर्ण गावाचा आम्ही विरोध घेतला. मात्र, भाजपातील पक्षश्रेष्ठी यांना स्थानिक नगरसेवकांना महत्त्वाची पदे द्यायची नाहीत. दाद मागण्यासाठी गेले असता उडवा-उडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे नाईलाजाने आम्ही राजमीनामा देण्याचा निर्णय घेतला.