पाणीपुरवठा ठेकेदारास एक कोटीचा दंड ; आयुक्तांचा दणका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/acfc07fe5fee5fa25bd9f45f2099b186.jpg)
पिंपरी – शहराच्या ४० टक्के भागात २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या कामाचा ठेकेदाराला दिलेला निर्धारित कालावधी संपुष्टात आला आहे. आतापर्यंत ठेकेदाराने केवळ ३० टक्के काम पूर्ण केले आहे. ठेकेदाराला आतापर्यंत कामाचे ३५ कोटी रुपये देण्यात आले आहेत. करीही निर्धारित कालावधीत काम पूर्ण न केल्यामुळे ठेकेदाराला एक कोटीचा दंड ठोठाविण्यात आला असून, बिलाच्या रकमेतून ५० लाख वसूल केले आहेत. तर, उर्वरित ५० लाख वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
केंद्र सरकारने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजने (जेएनएनयुआरएम) अंतर्गत महापालिका हद्दीत ४० टक्के भागात २४ तास पाणीपुरवठा प्रकल्प राबविण्यासाठी मंजुरी दिली होती. त्यानुसार केंद्रीय सनियंत्रण समितीने १४३ कोटी रुपयांच्या प्रकल्पास मान्यता दिली. तर, या रकमेतून फक्त प्रकल्प उभारणी होणार असल्याने प्रकल्पाच्या पाच वर्षे देखभाल दुरुस्तीकरिता आणखी ७४ कोटी रुपये अधिक मोजण्याची तयारी महापालिकेने केली. या बहुचर्चित योजनेसाठी २१७ कोटी रुपये अंदाजपत्रकीय रक्कम प्रस्तावित करण्यात आली.
चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेने नोव्हेंबर २०१५ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविली. दोन ठेकेदारांनी निविदा भरल्या. त्यात निकोप स्पर्धा झाली नाही. तरीही सर्वांत कमी दराची २०७ कोटी रुपयांची निविदा भरणाऱ्या ठेकेदाराला काम देण्यात आले. या कामासाठी १८ जून २०१६ ठेकेदाराला कामाचे आदेश दिले.
दिघी, भोसरी गावठाण, मोशी, जय गणेश साम्राज्य, स्पाईन रस्ता, संभाजीनगर, शाहूनगर, निगडी, यमुनानगर, प्राधिकरण, चिंचवडमधील केशवनगर, प्रेमलोक पार्क, थेरगाव, दत्तनगर, सांगवीच्या काही भागात अद्यापही काम संथगतीने सुरू आहे. मुदत संपलीतरी ३० टक्केच काम पूर्ण झालेले आहे. कामात दिरंगाई केल्यामुळे ठेकेदाराला दंड करण्यात आला आहे. या प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी ठेकेदाराकडे पाठपुरावा सुरू आहे, असे हर्डीकर यांनी सांगितले.