पर्यावरण संवर्धनासाठी रुजविली वृक्षलागवड “संस्कृती”

संस्कृती को. ऑप. हौसिंग सोसायटीतील रहिवाशांचा पुढाकार
पिपरी- चिखलीतील पाटीलनगर परिसरामधील संस्कृती को. ऑप. हौसिंग सोसायटीमधील रहिवाशांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पुढाकार घेऊन सोसायटीमध्ये विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड केली. त्या वृक्षांचे संवर्धन सोसायटीमधील नागरिक करत असून या सोसायटीचा उपक्रम इतर सोसायट्यांसाठी आदर्श ठरत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रदुषण आणि त्यामुळे वाढत जाणाऱ्या आजारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येक एक गुंठ्याला एक झाड लावणे हे बांधकाम व्यावसायिकांनाही बंधनकारक आहे. मात्र अनेक ठिकाणी बांधकाम व्यावसायिक गृहप्रकल्प उभारणीनंतर वृक्षलागवड करत नाहीत. मात्र सोसायटीतील सदस्य पुढाकार घेऊन वृक्षलागवड करतात.
शहरामध्ये अनेक सोसायट्यांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन केले जात आहे. त्यामध्ये चिखलीतील संस्कृती को.ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटीनेही पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एक पाऊल पढे टाकले आहे. सोसायटीतील या उपक्रमाचे कौतुक प्रभाग क्रमांक एक च्या नगरसेविका साधना मळेकर यांनी केले आहे.





