पर्यावरण रक्षणार्थ शिवसेना राबविणार वृक्षवेली उपक्रम

– ‘वृक्षवेलींच्या स्वरूपात शिवसेना आपल्या घरात’ या उपक्रमाचे आयोजन
पिंपरी ( महा ई न्यूज ) – शिवसेनेचा वर्धापनदिन आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त पर्यावरण रक्षण करणारा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात ‘वृक्षवेलींच्या स्वरूपात शिवसेना आपल्या घरात’ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले आहे, अशी माहिती शिवसेनेचे नगरसेवक ॲड. सचिन भोसले यांनी दिली. यावेळी शहराध्यक्ष योगेश बाबर, शहर महिला संघटिका उर्मिला काळभोर आदी उपस्थित होते.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनानूसार पिंपरी परिसरात पर्यावरण संतुलन आणि संवर्धनासाठी जनजागृती करीत 54 हजार रोपांचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात शनिवारी (27 जुलै 2019) सकाळी मुंबईत मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रोप भेट देऊन करण्यात येणार आहे. त्यानंतर पिंपरी परिसरातील नागरिकांना घरोघरी जाऊन रोपांचे वाटप करण्यात येईल.
पर्यावरण संतुलन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. त्यासाठी पुढाकार घेऊन काम करणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकांनी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी एक झाडं लावणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा योजना राबविणे गरजेचे आहे. पिंपरी परिसरातील नागरिकांना वृक्षांचे वाटप करून त्याचे महत्त्व पटवुन दिले जाणार आहे. या परिसरातील सर्व नागरिकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेवक भोसले यांनी केले आहे.
शहर महिला संघटिक ॲड. उर्मीला काळभोर म्हणाल्या की, पिंपरीतील डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात महिलांसाठी मोफत मॅमोग्राफी तपासणी शिबीराचे आयोजन केले होते. या तपासणीचा सुमारे पाचशे महिलांनी लाभ घेतला आहे.





