नेहरूनगर येथील पालिकेच्या इमारतीत न्यायालयाचे लवकरच स्थलांतर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/pcmc-1-4.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
नागरिकांना न्यायालयीन कामकाजाच्या सोयीसाठी नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलासमोरील इमारत फर्निचर साधनसामग्री, इतर सोयीसुविधांसह नाममात्र भाडेदराने उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांचे खटले चालविण्यासाठी मोरवाडी येथे दोन मजली इमारतीत दिवाणी आणि फौजदारी न्यायालय आहे. मोरवाडी आणि आकुर्डी येथे मिळून शहरात केवळ सहा कनिष्ठस्तर न्यायालये कार्यरत आहेत. मात्र, मोरवाडी येथील न्यायालयाची इमारत कामकाजाच्या दृष्टीनवे अपुरी ठरत आहे. अपु-या न्यायदान व्यवस्थेमुळे सुमारे 45 हजारापेक्षा जास्त दावे प्रलंबित आहेत. त्यामुळे न्यायव्यवस्था, न्यायालयीन कर्मचारी, पक्षकार, वकीलवर्ग या सर्व घटकांवर ताण पडत आहे.
नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलासमोर 4 हजार 374 चौरस मीटर भुखंडावर पार्कींग अधिक तीन मजले अशी इमारत विकसकामार्फत बांधण्यात आली आहे. नेहरूनगर येथील इमारतीत पिंपरी न्यायालयाची बैठक व्यवस्था झाल्यास, सिनिअर कोर्ट, सेशन कोर्ट, मोटार वाहन कोर्ट चालू केल्यास नागरिकांना जलदगतीने न्याय मिळणे शक्य होईल.
इमारतीच्या फर्निचरसह सुचविलेल्या 13 लाख 3 हजार रूपये मासिक भाडे मंजुरीस राज्याच्या वित्त विभागाने असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे पिंपरी न्यायालयाच्या स्थलांतराच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. नेहरूनगर येथील इमारतीत स्थापत्य काम वगळता न्यायालयीन कामकाजासाठी लागणा-या फर्निचरचा खर्च कमी आहे. नाममात्र भाडेदराने न्यायालयीन कामकाजासाठी फर्निचर साधनसामग्री, इतर सोयींनी सुसज्ज इमारत महापालिकेने न्यायालयीन कामकाजासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या विषयाला उपसुचनेसह स्थायीने मंजुरी दिली आहे.