नव्या दमाच्या कार्यकर्त्यांसोबत माजी आमदार विलास लांडे यांचे ‘ऑपरेशन पीसीएमसी’
- राष्ट्रवादीतील मरगळलेल्या समर्थकांना दिली बगल
- युवा पिढीला सोबत घेत सत्ताधारी भाजपाला आव्हान
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मातब्बर नेते आणि माजी आमदार विलास लांडे यांनी आता नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेत ‘ऑपरेशन पीसीएमसी’ हातात घेतले आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आत्मचिंतन करीत स्वत:भोवतील असलेले पण मरगळ आलेल्या जुन्या-जाणत्यांना बाजूला ठेवून लांडे यांनी नवोदितांना सोबत घेत राजकीय मोट बांधणीला सुरूवात केली आहे.
माजी आमदार लांडे यांच्याभोवती समर्थक कार्यकर्त्यांचे जाळे आहे. मात्र, पक्षांतर्गत बैठका- चर्चा यावेळी काही ठराविक मंडळींचा लांडेसोबत वरचष्मा आजवर दिसत होता. परंतु, गेल्या काही दिवसांपासून लांडे यांच्यासोबत दिसणारे चेहरे नवीन आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लांडे यांच्या राजमाता जिजाऊ महाविद्यालयातील कार्यालयात नवोदित कार्याकर्ते, इच्छुक आणि भाजपावरील नाराजांची गर्दी होताना दिसते. दुसरीकडे, विद्यमान शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनीही लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली रान तापवायला सुरूवात केली आहे.
***
शहर राष्ट्रवादीचा कारभार भोसरीतून?
विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेले माजी आमदार विलास लांडे गेल्या काही दिवसांत कामालीचे सक्रिय झाले आहेत. एक-एक विषयाला हात घालीत लांडे यांनी भाजपाचा बालेकिल्ला पोखरायला सुरूवात केली आहे. दुसरीकडे भोसरीतील राजमाता जिजाऊ महाविद्यालयातील कार्यालयातून लांडे पाटील अप्रत्यक्षपणे शहर राष्ट्रवादीचा कारभार हाकत आहेत, अशी चर्चा राष्ट्रवादी कार्याकर्त्यांमध्ये आहे.