देहू येथे बैलपोळा उत्साहात साजरा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/IMG-.jpg)
देहुरोड – देहुगाव, विठ्ठलनगर, माळीनगर, बोडकेवाडी, सांगुर्डी व येलवाडी भागातील शेतकऱ्यांनी ताशा, हलगी, तुतारी वाजंत्र्यांच्या पिपाणी, बॅंजो, बॅंड या पारंपरिक वाद्यांत भंडारा उघळत आणि फटाक्यांची आतषबाजी करीत बैलांची वाजत-गाजत मिरवणूक काढली.
देहू-माळवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालकांनी मिरवणुकीत सहभागी बैलजोडी मालकांना मका चाऱ्याच्या बियाणाचे वाटप केले. येथील रोटरी क्लब ऑफ देहुगावने कासरे वाटले व बैल मालकांचे स्वागत केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष गणेश पानसरे, सचिव संजय भसे, शांताराम हगवणे, भैया कारके, विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष अभिमन्यू काळोखे, संचालक बाळासाहेब टिळेकर, नारायण पचपिंड, शशिकांत काळोखे, पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब काळोखे, देहुगाव शिवसेना प्रमुख सुनिल हगवणे, माजी सरपंच हेमा मोरे यांनी छत्रपती शिवाजी चौकात स्वागत केले.
देहुगाव परिसरातील विठ्ठलनगर, माळीनगर, येलवाडी, सांगुर्डी, झेंडेमळा येथील शेतकऱ्यांनी वर्षभर आपल्या शेतावर काबाडकष्ट करीत कामाचा गाडा ओढणाऱ्या लाडक्या बैल जोडींची मिरवणूक काढली. मिरवणुकीत सामील झालेल्या बैलजोडींच्या शिंगांना इंगळ (रंग) बेगड (रंगीत पट्ट्या) व सोनेरी लावून रंगवले होते. अंगावर वेगवेगळ्या नायकांची नावे काढून बैलांना सजवले होते.
मिरवणुकीत बॅंडसह पारंपारिक ताशा व हलगी व डफ-वाजंत्री या वाद्यांच्या तालावर वाजत गाजत भंडाराची उधळण करीत मिरवणूक काढली. या मिरवणुकीला सायंकाळी सहाच्या सुमारास सुरवात झाली. मिरवणुकीत सहभागी झालेली बैलजोडी गावातील मारूती मंदिरासमोरून बाजार आळीमार्गे मुख्य मंदिर महाद्वार चौक व दक्षिण मुखी काळा मारूती मंदिराला प्रदक्षिणा करीत घरी परतले. लाडकी बैल घरी परतल्यानंतर शेतकऱ्यांनी आणि सुवासिनींनी बैलांचे औक्षण केले व पुरण-पोळी खावू घातली.
गेल्या काही वर्षांत या भागातील पशूधनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने काही दिवसांतच बैलपोळा केवळ कल्पना व आठवणी म्हणूनच पाहावा लागेल. जमिनी विकल्याने दारातील पशूधन सांभाळणे संपुष्टात आल्याने नामधारी शेतकऱ्यांनी बाजारातून मातीची बैल आणून पोळा साजरा केला.
देहुगाव सर्वच दृष्टीने शहराजवळ असल्याने येथील जमिनीला सोन्याच भाव आला आहे. गावात विकास आराखडा राबविला गेल्याने सोयी सुविधांचा विकास झाला आहे. यामुळे परिसरातील आयटी पार्क, औद्योगीक क्षेत्रात पिंपरी-चिंचवड उद्योग नगरी, शिक्षणाचे माहेरघर पुणे, शैक्षणिक क्षेत्रात काम करणारे चाकरमानी यांनी देहूला पसंती दिल्याने शेतकऱ्यांनी शेती विकण्यास सुरुवात केली. त्यामुळे शेतीचे क्षेत्र कमी झाले आहे. याचा परिणाम पशूधन मोठ्या प्रमाणात घटले आहे. शेतीच न राहिल्याने पशुधनाला सांभाळणे अवघड झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपले पशुधन विकल्याने परिसरातील पशुधनाची झपाट्याने घट झाली आहे.