दुध अनुदानासाठी सरकारला 6 ऑक्टोबरपर्यंत डेडलाईन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/1-2-1.jpg)
पुणे (महा ई न्यूज ) – राज्य सरकारने 31 ऑगस्टअखेरचे गाईच्या दुधाचे प्रति लिटरचे पाच रुपयांचे अनुदान 6 ऑक्टोंबरपर्यंत संबंधित दूध संस्थांना तत्काळ वितरित करण्याची मागणी सहकारी व खाजगी दूध संस्थांच्या संयुक्त बैठकीत शनिवारी रात्री करण्यात आली. त्यानुसार अनुदान न मिळाल्यास पुन्हा 9 ऑक्टोंबरला संयुक्त बैठक घेऊन योजनेतून बाहेर पडण्यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात दुधाचे भाव पडल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मोठे आंदोलन उभारले. त्यानंतर तोडगा निघून सरकारने 1 ऑगस्टपासून 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ गुणप्रतिच्या गाईच्या दुधाचा खरेदी दर लिटरला 25 रुपये करण्याचा निर्णय घेतला आणि पॅकिंगमधील दुध वगळून उर्वरित दुधासाठी लिटरला पाच रुपये अनुदान शासनाकडून देण्याचे निश्चित झाले. मात्र, सर्व माहिती देऊनही अनुदान मिळत नसल्याने नगर रोडवरील विमाननगर भागातील एका हॉटेलात सहकारी व खाजगी दूध संघांच्या प्रतिनिधींची योजनेतील सहभागाबाबत महत्त्ववपूर्ण बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
बैठकीस दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष विनायक पाटील, संघाचे मानद सचिव प्रकाश कुतवळ यांच्यासह रणजित निंबाळकर, दशरथ माने, प्रितम शहा, श्रीपाद चितळे आदींसह गोकुळ, राजारामबापू, शिवामृत, वारणा, वाळवा, प्रभात, डायनामिक आदींसह एकूण दूध संस्थांचे सुमारे 75 प्रतिनिधी उपस्थित होते.