दिव्यांगांच्या हितासाठी उडान फाउंडेशनची स्थापना
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/udan.jpg)
- माजी उपमहापौरांच्या हस्ते संस्थेचा शुभारंभ
- अधिकारी संभाजी ऐवले यांनी दिली योजनांची माहिती
पिंपरी / महाईन्यूज
दिव्यांगांच्या समस्या सोडविण्याबरोबरच त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजना राबविण्यासाठी उडान दिव्यांग फाउंडेशनची स्थापना माजी उपमहापौर तुषार हिंगे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नागरवस्ती विकास योजना विभागाचे समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले यांची विशेष उपस्थिती होती.
वीर सावरकर भवन निगडी प्राधिकरण येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिनेश श्रीवास, शेखर काटे, दिपक भोजने, प्रहार संघटनेचे अध्यक्ष दत्ता भोसले, उपाध्यक्ष रवींद्र वाकचौरे आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून शक्य होईल तेवढी मदत दिव्यांगांना देण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन माजी उपमहापौर तुषार हिंगे यांनी दिले.
समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले पालिकेतर्फे दिव्यांगांसाठी राबविण्यात येणा-या योजनांची माहिती दिली. पालिका लवकरच अपंग भवन उभारणार आहे. दिव्यांगांना शासनाच्या व पालिकेच्या योजनांचा लाभ देण्यात प्रशासकीय स्तरावर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. दिव्यांगांच्या हितासाठी उडान फाउंडेशनने पुढाकार घ्यावा. त्यांना सर्वतोपरी मदत करण्याची आमची तयारी आहे. शहरातील जास्तीत जास्त दिव्यांगांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधिकारी ऐवले यांनी केले.
प्रास्ताविक करताना संघटनेचे अध्यक्ष आनंद बनसोडे म्हणाले की, फाउंडेशनचा मुख्य उद्देश दिव्यांगांना आत्मनिर्भर करणे आहे. त्याकरिताच उडान दिव्यांग फाउंडेशनची स्थापना केली आहे. कोरोना काळात तुषार हिंगे माजी उपमहापौर यांनी केलेल्या कार्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहरातील दिव्यांगामार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर दिव्यांगांना काट्या, कुबड्यांचे व सॅनीटायझरचे वाटप केले. दिपक भोजने, रविंद्र वाकचौरे, विनोद चांदमारे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव बाळासाहेब तरस, रवी भिसे, योगेश सोनार, हरेश्वर गाडेकर, मोहम्मद शफी पटेल, शिवाजी पवार यांनी केले. उत्कृष्ट सुत्रसंचालन करून भूषण इंगळे यांनी आभार मानले.