दिवाळी पाडव्यानिमित्त चिंचवडमध्ये होणारा गवळी समाजाचा ‘सगर उत्सव’ रद्द

पिंपरी । प्रतिनिधी
चिंचवड येथील लिंगायत गवळी समाजाच्या वतीने दरवर्षी दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने होणारा ‘सगर उत्सव’ रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती लिंगायत गवळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी दिली.
‘सगर उत्सव’ हा पारंपरिक उत्सव म्हणून दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी गाई, म्हशी, रेडे, यांना रंगरंगोटी करून अंगावर नक्षी काढून झूल टाकून अंगावर गुलाल, भंडारा टाकून सजवण्यात येते. समाजातील पंच मंडळींनी स्थापन केलेल्या ‘सागरा’वर मिरवणूकने वाजत गाजत नेण्यात येते.
या ठिकाणी म्हशी व रेडे पळविण्याची स्पर्धा होते. प्रत्येक समाज बांधव आपल्याकडील म्हशी, रेडे सागरावर घेऊन येतात. हा उत्सव पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करतात व या उत्सवाचा आनंद घेतात. परंतु यावर्षी कोरोनाचे संकट असून उत्सव साजरा करण्यास पोलीस प्रशासन परवानगी देत नाही. त्यामुळे यावर्षी दिवाळी पाडाव्यानिमित्त होत असलेला ‘सगर उत्सव ‘रद्द करण्याचा निर्णय पंचांकडून घेण्यात आला असल्याची माहिती माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी दिली.
 
				 
 
 
 
 
 




