डांगे चाैकात ग्रेडसेपरेटरच्या कामास मान्यता, वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

पिंपरी ( महा ई न्यूज ) – थेरगाव येथील डांगे चौकात ग्रेडसेपरेटर बांधण्यात येणार आहे. याकरिता सुमारे 17 कोटी 96 लाख 94 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. या ग्रेडसेपरेटरमुळे डांगे चाैकातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने डांगे चौकात ग्रेडसेपरेटर कामाची 24 कोटी 71 लाख रुपयांची निविदा 12 सप्टेंबर 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या निविदा प्रक्रियेत टी. अॅन्ड टी इन्फ्रा (16 कोटी 54 लाख), व्ही. एम. मातेरे इन्फ्रा (16 कोटी 75 लाख)आणि कुष्णाई इन्फ्रा प्रा. लि (17 कोटी)यांनी सहभाग घेतला. 5 नोव्हेंबर 2018 रोजी ही निविदा उघडण्यात आली. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी टी. अॅन्ड टी इन्फ्रा यांना 26 डिसेंबर 2018 रोजी कंत्राट दर कमी करण्याची लेखी विचारणा केली. 3 एप्रिल 2018 रोजी या ठेकेदाराने कंत्राटाचा सुधारित दर सादर केला. त्यात बांधकाम खर्च 16 कोटी 54 लाख 10 हजार रुपये, टेस्टिंग चार्जेस, डिझाईन चार्जेस, रॉयल्टी चार्जेस यासह कंत्राटदाराने 17 कोटी 96 लाख 94 हजार दर निश्चित केला. या खर्चाला मान्यता देण्याचा देण्याचा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी ऐनवेळी प्रस्ताव आणून शेवटच्या स्थायी समितीने मान्यता दिली.

दरम्यान, हिंजवडी आयटी पार्ककडे जाणा-या नागरिकांना डांगे चाैकात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. चिंचवड, आकुर्डी, प्राधिकरण, भोसरी या भागात राहणारे नागरिक आयटीपार्क आणि परिसरात जाण्यासाठी बीआरटीरोडचा वापर करतात. त्यांना डांगे चौकात अधिक त्रास होतो. याबाबत स्थानिक नागरिक डांगे चौकातील अडचणींबाबत अनेकदा तक्रारी करीत होते. त्यामुळे नागरिकांचा वाहतूक कोडींतून मुक्तता मिळावी म्हणून डांगे चाैकात ग्रेड स्पेडरचे काम लवकच सुरु होईल.





