‘जप्तीची कारवाई केली तर मी कुलूप तोडणार’, दत्ता सानेंची पालिका प्रशासनाला ‘धमकी’
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/IMG_20200217_172115-1.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने शास्ती कर न भरणा-या मिळकतधारकांना जप्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत. ही कारवाई मोठ्या प्रमाणावर करणार असल्याचा दम ही भरला आहे. परंतु, सरसकट शास्ती कर माफ करण्याचा विषय राज्य सरकारच्या कोर्टात आहे. जोपर्यंत हा निर्णय होत नाही, तोपर्यंत पालिका प्रशासनाने नागरिकांना जप्तीची भिती घालू नये. जर, नागरिकांच्या मिळकतींवर जप्तीची कारवाई केली. तर, मी स्वतः कुलूप तोडून संबंधित मिळकतधारकांना त्याचा ताबा देणार, असा इशारा माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पत्रकार परिषदेत दिला.
महापालिकेने नागरिकांना मिळकत कर आणि शास्ती कर जमा करण्याच्या नोटीसा पाठविल्या आहेत. सात दिवसांच्या आत मिळकत कर न भरल्यास अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण पथकाद्वारे संबंधित बांधकाम पाडणार असल्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाच्या या अडमुठी भूमिकेवर आक्षेप घेत माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी अधिका-यांवर भडास काढली आहे. या धमकीला नागरिक कदापी भीक घालणार नाहीत. सत्ताधारी भाजपच्या दोन्ही आमदारांनी शास्ती कर माफ झाल्याचे सांगून शहरात फ्लेक्स लावले. एवढेच नव्हे तर, पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. प्रत्यक्षात मात्र, शास्तीचा मुद्दा अद्यापही सुटलेला नाही. हे सर्व झाल्यानंतर पालिकेतील भाजपने खोटारडेपणा करत सरसकट शास्ती कर माफ करण्याचा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीने राज्य सरकारकडे पाठविला आहे.
याबाबतचा निर्णय राज्य सरकारच्या आधीन आहे. सरकार जोपर्यंत यावर निर्णय देत नाही. तोपर्यंत महापालिकेच्या अधिका-यांनी नागरिकांना मिळकत कर अथवा शास्ती कर मागायचा नाही. दिलेल्या नोटीसा रद्दबातल कराव्यात. सात दिवसांत कर न भरल्यास मिळकतीवर जप्तीची कारवाई करण्याची दिलेली धमकी मागे घ्यावी. जर जप्तीची कारवाई केली. तर, मी स्वतः अधिका-यांनी लावलेले कुलूप तोडून संबंधित मिळकधारकाला पुन्हा घरात राहण्यास सांगणार आहे, असा इशारा साने यांनी दिला.