गहुंजेतील बलात्कार प्रकरण, आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/crime-2.jpg)
पुणे – पुण्यातील गहुंजे नोव्हेंबर 2007 मध्ये झालेल्या एका तरुणीच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही आरोपींची फाशी रद्द केली आहे. त्याऐवजी दोन्ही आरोपींना मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आली आहे. न्यायमूर्ती बी.पी धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
बीपीओमध्ये काम करणाऱ्या तरुणीच्या बलात्कार आणि हत्येने मोठी खळबळ उडाली होती. हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर लावून धरण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपी कॅबचालक पुरुषोत्तम बोराटे आणि साथीदार प्रदीप कोकडे यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी भक्कम पुरावे गोळा करून आरोपींना फाशीपर्यंत पोहोचवले होते. यानंतर आरोपींनी राष्ट्रपतींना दयेचा अर्ज केला होता. राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर प्रशासनाकडून फाशीची अंमलबजावणी करण्यात विलंब झाला. आरोपींना 24 जून रोजी मृत्युदंडाची शिक्षा होणार होती. परंतु विलंब झाल्याने मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची फाशीची शिक्षा रद्द करत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पुरुषोत्तम बोराटे आणि प्रदीप कोकडे यांना एकूण 35 वर्षे जन्मठेप भोगावी लागणार असल्याचे आरोपींचे वकील युग चौधरी यांनी माध्यमांना सांगितले.