गल्ल्यातील पैसे काढ, नाहीतर मारून टाकीन’, जबरदस्तीने रोकड पळवली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/08/crime-1-1.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|
दुकानाची तोडफोड करून जिवे मारण्याची धमकी देत गल्ल्यातील रोकड लुटल्याप्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना भोसरीतील दिघी रोड येथे घडली.
ओंकार ढोबळे (वय 24), सौरभ मोतीरावे (वय 19 दोघेही रा. संत तुकारामनगर, भोसरी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी मोहनलाल वरदाजी सोहेल (वय 34, रा. दिघी रोड, भोसरी ) यांनी फिर्याद दिली. फिर्यादी हे रविवारी (ता. 2) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास त्यांच्या दिघी रोडवरील मिठाई विक्रीच्या दुकानावर होते. त्यावेळी त्याठिकाणी आलेल्या आरोपींनी सिमेंटचा ब्लॉक दुकानाच्या काचेवर मारून काच फोडली.
दुकानात घुसून ‘मालक कोठे आहे, गल्ल्यातील पैसे काढ, नाहीतर मारून टाकीन’, अशी धमकी देत काऊंटरवरील दीड हजारांची रोकड जबरदस्तीने घेतली. त्यावेळी त्यांना अडविण्यासाठी दुकानाचे मालक गोरख गवळी त्याठिकाणी आले असता त्यांना हाताने मारहाण करीत आरोपी दुचाकीवरून पसार झाले. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.