क्षेत्रीयस्तरावर दिव्यांग योजनाचे शिबीर घेवून लाभ देणार – स्मिता झगडे

- समुहसंघटक, नागरवस्ती अधिकारी कर्मचा-यांना ट्रेनिंग
- संवेदनशिलतेबाबत पालिका विभाग प्रमुखांची सुकाणू समिती
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग व्यक्तींना महापालिकेच्या विविध योजनांचा लाभ व्हावा, त्यांना सक्षम बनवून स्वयंरोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ‘मायक्रो प्लाॅनिंग’ करण्यात येत आहे. तसेच त्यांचे क्षेत्रीयस्तरावर शिबीरे घेवून त्यांना विविध योजनाचा लाभ देण्यात येणार आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी दिली.
चिंचवड येथील आॅटो क्लस्टरमध्ये सोमवार (दि.27) दिव्यांग व्यक्तींच्या योजना राबविण्याबाबत समुहसंघटक, एलयुएम, अधिकारी, कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे, सल्लागार समीर घोष यांनी मार्गदर्शन केले.
शहरात सुक्ष्म पातळीवर दिव्यांग व्यक्तींचे सर्व्हेक्षण सुरु आहे. दिव्यांग व्यक्ती 21 प्रकारात मोडतात. त्या सर्वांसाठी एक प्रश्नावली तयार करुन त्यांची सविस्तर माहिती संकलित करण्यात येत आहे. त्यानंतर दिव्यांग व्यक्तींसह एनजीओ, स्वयंसेवी संस्थाची 30 जूनपर्यंत एक कार्यशाळा घेवून विविध योजनावर चर्चा करण्यात येईल. तसेच क्षेत्रीय कार्यालयनिहाय दिव्यांग व्यक्तीचे शिबीर घेवून त्यांना योजनांचा लाभ दिला जाणार आहे.
दरम्यान, महापालिकेच्या विभागप्रमुखांना दिव्यांग व्यक्तींबाबत संवेदनशिलता तयार व्हावी, याकरिता आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती तयार करण्यात आली. त्या समितीत अतिरिक्त आयुक्त, सहायक आयुक्त, सर्व विभाग प्रमुख असणार आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी सर्वांच्या चर्चेतून वेगवेगळ्या कल्पना, सुचना घेवून योजनाची आखणी करण्यात येणार आहे, असेही सहाय्यक आयुक्त झगडे यांनी सांगितले.





