अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली! दिग्दर्शकाने ‘मुन्नाभाई 3’ विषयी दिली मोठी अपडेट

Rajkumar Hirani : बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय फ्रँचायझींपैकी एक असलेल्या ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या चित्रपटांनंतर चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. तब्बल दोन दशकांनंतर दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी ‘मुन्नाभाई 3’ संदर्भात महत्त्वाची घोषणा केली असून चित्रपटाच्या पटकथेवर सध्या काम सुरू असल्याची अधिकृत माहिती एका मुलाखतीदरम्यान दिली आहे.
‘प्रेम पेद्रो’ या आगामी ओटीटी (OTT ) मालिकेच्या प्रमोशनदरम्यान एका न्यूज चॅनेलसोबत संवाद साधताना राजकुमार हिरानी यांनी हा खुलासा केला. ते म्हणाले की, ‘मुन्नाभाई’च्या तिसऱ्या भागाची कथा पूर्ण झाली असून पटकथा अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे संजय दत्त आणि अर्शद वारसी यांची गाजलेली ‘मुन्ना’ आणि ‘सर्किट’ ही जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मात्र, चित्रपटाचे अधिकृत नाव, कोणकोण कलाकार असणार किंवा प्रदर्शनाची तारीख याबाबत माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा – केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होणार! महाराष्ट्रातून नव्या चेहऱ्यांना संधी
दरम्यानच्या काळात ‘मुन्नाभाई चले अमेरिका’ हे नाव तिसऱ्या भागाला देण्यात आल्याची चर्चा होती. त्याचा टीझरही समोर आला होता. मात्र, नंतर याबाबत कोणतीही माहिती समोर न आल्याने हा प्रोजेक्ट बंद झाल्याचे सांगण्यात आले होते. याविषयी बोलताना राजकुमार हिरानी यांनी मोठा खुलासा केला आहे.
ते म्हणाले, “तो टीझर केवळ एका कल्पनेवर आधारित होता. त्यानंतर कथेला योग्य दिशा मिळाली नाही. आता मात्र आम्ही विविध कल्पनांवर काम करत आहोत आणि मुन्ना-सर्किटची जोडी दमदार कथेसह प्रेक्षकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.” राजकुमार हिरानी यांच्या या घोषणेनंतर ‘मुन्नाभाई 3’ची चर्चा पुन्हा रंगली असून, संजय दत्त आणि अर्शद वारसी यांच्या पुनरागमनाची चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली आहे.





