एमआयटी कॉलेज आळंदीतील चार विद्यार्थ्यांची ‘सायबर वॉरियर्स’ म्हणून निवड
क्विक हील फाऊंडेशन व एमआयटी कॉलेजमधील सामंजस्य करारातून सायबर जनजागृतीला नवी दिशा

आळंदी | प्रतिनिधी
डिजिटल सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने क्विक हील फाऊंडेशन आणि एमआयटी आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, आळंदी यांच्यात झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत महाविद्यालयातील चार विद्यार्थ्यांची ‘सायबर वॉरियर्स’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
या उपक्रमात शिवप्रसाद जाधव यांची अध्यक्ष, मानसी जाधव यांची सचिव, पूर्वजा महाजन यांची ॲक्टिव्हिटी डायरेक्टर आणि सोहेश देशमुख यांची मीडिया डायरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे विद्यार्थी सायबर सुरक्षेविषयी जनजागृती, प्रशिक्षण आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजात डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणार आहेत.
पुणे येथील क्विक हील फाऊंडेशनच्या कार्यालयात आयोजित विशेष प्रशिक्षण सत्रात अजय शिर्के, दिपू सिंग आणि गायत्री केसकर यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, ऑनलाइन फसवणूक प्रतिबंध आणि डिजिटल सुरक्षेच्या विविध पैलूंविषयी मार्गदर्शन केले.
हेही वाचा
क्रीडा क्षेत्राला समर्पित चार दशकांची तपस्या: क्रीडा अधिकारी शाम भोसले सेवानिवृत्त
यावेळी क्विक हील फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना, “सायबर सुरक्षेबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे,” असे सांगितले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. वाफारे, उपप्राचार्या डॉ. अक्षदा कुलकर्णी, शिक्षक समन्वयक प्रा. अमित ताले, विभागप्रमुख तसेच संगणकशास्त्र विभागातील प्राध्यापकांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या उपक्रमाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये आणि समाजामध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करून सुरक्षित डिजिटल भारत घडविण्यासाठी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग राहणार असल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले.
“आजच्या डिजिटल युगात सायबर सुरक्षेचे ज्ञान ही काळाची गरज आहे. आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची ‘सायबर वॉरियर्स’ म्हणून झालेली निवड ही संस्थेसाठी अभिमानाची बाब आहे. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात सायबर सुरक्षिततेबाबत व्यापक जनजागृती होईल आणि जबाबदार डिजिटल नागरिक घडविण्यात त्यांचे मोलाचे योगदान राहील, असा मला विश्वास आहे.”
– डॉ. बी. बी. वाफारे, प्राचार्य.





