क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडला आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिल्या शुभेच्छा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/IMG-20201105-WA0029.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग संघाकडून खेळताना चमकदार कामगिरी करून सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधलेल्या ऋतुराज गायकवाड याचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आज (गुरूवार) घरी जाऊन कौतुक आणि सत्कार केला. तू क्रिकेटमध्ये घेत असलेले कष्ट पाहून आम्हाला तुझा अभिमान वाटतो. तुला या खेळामध्ये मोठे यश प्राप्त व्हावे. अशाच पद्धतीने तू पिंपरी-चिंचवडचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवावे, अशा शब्दांत आमदार लक्ष्मण जगताप यांनी ऋतुराजला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ऋतुराजच्या या कतृत्वाबद्दल त्याच्या आई-वडिलांचे आमदार जगताप यांनी अभिनंदन केले.
आयपीएलच्या १३ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज संघातील एका नवोदित खेळाडूने चमकदार खेळी करून सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधून घेतले. चेन्नई सुपर किंग्ज हा संघ स्पर्धेच्या बाहेर पडला असला तरी या नवोदित खेळाडूने आपल्या खेळाची सर्वांना दखल घेण्यास भाग पाडले. हा नवोदित खेळाडू म्हणजे पिंपरी-चिंचवडमध्ये राहणारा ऋतुराज गायकवाड. ऋतुराज आपल्या आई-वडिलांसह जुनी सांगवीमध्ये वास्तव्याला आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळताना शेवटच्या तीन सामन्यांमध्ये तीन अर्धशतके ठोकले आहेत. त्याच्या या खेळाने सर्व क्रिकेटरसिक प्रभावित झाले आहेत.
आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर त्याचे पिंपरी-चिंचवडनगरीत आगमन झाले आहे. ही बाब कळल्यानंतर आमदार लक्ष्मण जगताप आज (गुरूवार) ऋतुराजच्या घरी गेले. त्याच्या खेळाचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले. त्याने आयपीएलपर्यंत केलेल्या वाटचालीबाबत माहिती जाणून घेतली. त्याचे क्रिकेटप्रेम आणि घेतलेले कष्ट पाहून आम्हाला तुझा अभिमान वाटतो, अशा शब्दांत आमदार जगताप यांनी ऋतुराजचे मनोबल वाढविले. तसेच क्रिकेटमध्ये तुला मोठे यश प्राप्त व्हावे. तू पिंपरी-चिंचवडचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवावे, अशा शुभेच्छा त्याला दिल्या.
ऋतुराजच्या या वाटचालीत त्याची आई सविता गायकवाड आणि वडील दशरथ गायकवाड यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच ऋतुराजला हे कतृत्व गाजविता आले. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांनी ऋतुराजच्या आई-वडिलांचेही अभिनंदन केले. यावेळी महापौर माई ढोरे यांनीही ऋतुराजला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य संतोष ढोरे, उद्योजक धनंजय ढोरे, अमित पसरणीकर, नवीन लायगुडे, संतोष कलाटे, कृष्णा भंडलकर आदी उपस्थित होते.