breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारणलेखसंपादकीयसंपादकीय विभाग

पिंपरी-चिंचवड : भाजपाच्या महाविजयाची तयारी अन्‌ शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे ‘‘प्रभावी व्यवस्थापन’’

घर चलो अभियान : मावळ लोकसभा मतदार संघात जोरदार मोर्चेबांधणी

पिंपरी  : विशेष प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने ‘महाविजय- २०२४’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेद्वारे महाराष्ट्रातील एकूण ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. भाजपासाठी प्रत्येक जागा महत्त्वाची मानली जात असून, पिंपरी-चिंचवडमधील निर्णायक मतदान मावळ आणि शिरुर लोकसभेसाठी ‘किंगमेकर’ ठरणार आहे. त्यामुळे, पक्षनेतृत्त्वाकडून भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्त्वात चिंचवड आणि पिंपरी मतदार संघात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

महाविजय- २०२४ अंतर्गत घर चलो अभियान, भाजपा वॉरिअर्स संवाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बुधवार, दि. ११ ऑक्टोबर २०२३ रोजी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर येत आहेत. मावळ लोकसभा प्रवास दौरा कार्यक्रमाच्या तयारीची जबाबदारी शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्याकडे आहे. पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नुकतेच जाहीर केलेली कार्यकारिणी यानिमित्ताने कामाला लागली आहे.

निवडणूक व्यवस्थापनात प्रभावी हातखंडा असलेले शंकर जगताप यांच्या खांद्यावर  मावळ लोकसभेतील पिंपरी आणि चिंचवड या दोन प्रमुख विधानसभा मतदार संघांची जबाबदारी आहे. या दोन मतदार संघातच सुमारे ९ लाखाहून अधिक मतदार आहेत. पिंपरी, चिंचवड आणि मावळ असे घाटाच्या वरचे आणि कर्जत, पनवेल आणि उरण असे घाटाच्या खालचे असे सहा विधानसभा मतदार संघ असलेल्या या मावळ लोकसभा मतदार संघात पिंपरी आणि चिंचवडमधील मतदार निर्णायक ठरणार आहेत.

दरम्यान, महायुतीच्या माध्यमातून उमेदवार कोणीही असून, आम्ही लढण्याचा निर्धार केला आहे आणि जिंकण्याचा आत्मविश्वास आहे, असा दावा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. त्यामुळे ‘निवडणूक व्यवस्थापन’ प्रभावीपणे करुन मावळ पुन्हा काबिज करण्यासाठी भाजपाची यंत्रणा कामाला लागलेली पहायला मिळत आहे.

शंकर जगताप ठरणार मावळ लोकसभेचे ‘किंगमेकर’…

शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक मते पिंपरी आणि चिंचवडमधून मिळाली आहेत. त्यावेळी भाजपाचे तत्कालीन शहराध्यक्ष स्व. आमदार लक्ष्मण जगताप होते. बारणे आणि जगताप यांच्या राजकीय संघर्षाची परिस्थिती असतानाही लक्ष्मण जगताप यांनी ‘महायुती धर्म’ पाळला. त्याचा फायदा खासदार बारणे यांना निश्चितपणे झाला.  लक्ष्मण जगताप शहराध्यक्ष असताना झालेल्या या निवडणुकीत ‘‘निवडणूक व्यवस्थापनाची जबाबदारी’’ शंकर जगताप यांच्याकडे होती. दिवंगत जगताप यांच्यानंतर चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक झाली. त्यावेळी कसब्यातील जागा भाजपाला गमवावी लागली. मात्र, शंकर जगताप यांच्या अचूक व्यवस्थापनामुळे चिंचवडची जागा भाजपाला राखता आली, ही वस्तुस्थिती आहे. शंकर जगताप लोकसभा निवडणूक लढवतील, असे अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवले जात होते. मात्र, ‘‘मी लोकसभेसाठी इच्छुक नाही…’’ असे स्पष्ट करीत जगताप यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत शहराध्यक्ष या नात्याने शंकर जगताप पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आणि दिवंगत जगताप यांच्याप्रमाणे पुन्हा एकदा नेतृत्त्व क्षमता सिद्ध करणार, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

बावनकुळे यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी…

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पिंपरी-चिंचवडचा दौरा करणार आहेत. या निमित्त शहर भाजपाच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. बावनकुळे यांच्या स्वागताचे ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. तसेच, पिंपरीतील राधिका चौक- शगुन चौक- साई चौक या भागात रॅली काढण्यात येणार आहे. यासाठी पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदार संघातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागले आहेत.  या अभियानाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, विकासकामे आणि विविध योजनांची माहिती सर्वसमान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. ‘‘घर चलो अभियान’’ प्रभावीपणे राबवून भाजपा किंबहुना मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रमांची आखणी करण्यात येत आहे. याचा फायदा भाजपाला आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत होईल, असा दावा केला जात आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button