सोसायटीधारकांच्या मागण्यांबाबत पिंपरी-चिंचवड महापालिका सकारात्मक
आयुक्त शेखर सिंह यांच्या सूचनेनुसार अधिकाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन

पिंपरी : प्रतिनिधी
विकसकांनी स्वःखर्चाने पाणीपुरवठ्याची जबाबदारी घ्यावी, काम पुर्ण झाल्यानंतरच बांधकाम पुर्णत्त्वाचा दाखला द्यावा. पार्किंग देताना अधिकचे पैसे घेऊ नये यासह अनेक मागण्यांचे गाऱ्हाणे पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायटीधारकांनी महापालिका प्रशासनापुढे मांडल्या. सोसायटीधारकांच्या मागण्यांबाबत महापालिका सकारात्मक असून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी पिंपरी चिंचवड शहरातील सोसायट्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील सोसायट्यांचे प्रतिनिधी, शहराच्या विविध भागातील हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सोसायटी धारकांनी मागण्यांचे गाऱ्हाणे मांडले.
या वेळी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केलेले सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक, स्थापत्य विभागाचे सह शहर अभियंता ज्ञानदेव झुंधारे यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत सोसायटीधारकांच्या प्रश्नांवर चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे मान्य केले.
या बैठकीमध्ये चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे, पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी अध्यक्ष दत्तात्रय देशमुख, रावेत, किवळे फेडरेशनचे अध्यक्ष प्राजक्ता रुद्रवार उपस्थित होते.
हेही वाचा – ‘पंकजा मुंडे संभ्रमावस्थेत आहेत, म्हणून..’; एकनाथ खडसे यांचं विधान
या वेळी अनेक मागण्या अधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आल्या. यामध्ये विकासकांनी स्वखर्चाने पाणी पुरवणे गरजेचे आहे. भामा आसखेडचा टप्पा क्रमांक पाच आणि सहा पूर्ण होऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका पूर्ण क्षमतेने पाणी पुरणार नाही तोपर्यंत विकसक स्वखर्चाने पाणी पुरवतील असे हमीपत्र लिहून देऊन त्यांच्या गृहप्रकल्पांना बांधकाम पूर्णत्वाचे दाखले द्यावेत. तसेच पाणी न पुरविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
या बरोबरच मंजूर बांधकाम आराखड्यामध्ये सदनिका धारकांच्या संमतीशिवाय होणारे वारंवार बदल करू नये, अशी मागणी करण्यात आली. 61 टक्के सदनिका धारकांची सहमती असल्याशिवाय मंजूर बांधकाम आराखड्यामध्ये बदल करता येत नाही. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडून या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यांच्यावर कारवाई करावी. महापालिकेकडून भाग पूर्णत्वाचा दाखला घेऊन झाल्यानंतर सोसायटीमध्ये सोडलेल्या साईड मार्जिन मध्ये खुल्या जागेमध्ये सदनिका धारकाकडून बेकायदेशीरपणे लाखो रुपये घेऊन सदनिका धारकांना चार चाकी पार्किंग देतात. यामुळे सोसायटीमध्ये फायरची गाडी, म्बुलन्स,टॅंकर फिरत नाहीत. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही अतिशय गंभीर बाब आहे यावर चौकशी करून त्वरित कारवाई करावी अशी मागणी फेडरेशन मार्फत करण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहरातील बरेच बांधकाम व्यवसायिक पिंपरी चिंचवड महापालिकेकडून बांधकामाचा आराखडा मंजूर करून घेतल्यानंतर त्या आराखड्याप्रमाणे पूर्ण काम झाले नसताना देखील. अर्धवट काम झालेले असताना देखील सदर प्रकल्पाला भाग पूर्णत्वाचा दाखला दिला जातो. ही सदनिकाधारकांची फसवणूक आहे. त्यामुळे सादर केलेल्या आणि मंजूर करून घेतलेल्या बांधकाम आराखड्याप्रमाणेच पूर्ण काम झाल्यानंतरच सदर गृहप्रकल्पास बांधकाम पूर्णत्वाचे दाखले द्यावेत. अशी मागणी फेडरेशन कडून करण्यात आली. बांधकाम सुरू असताना खबरदारी घ्यावी. फुटपाथवर सर्वच ठिकाणी दुकानदाराने त्याचप्रमाणे भाजीपालावाल्यांनी, फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलेले आहे. यावर कारवाई करण्याची मागणी फेडरेशन तर्फे करण्यात आली. तसेच शहरातील वाहतूक कोंडीवर देखील पोलीस प्रशासनातील वाहतूक शाखेची समन्वय साधून यावर तोडगा काढण्यात यावा अशी मागणी फेडरेशन तर्फे करण्यात आली.
शहरातील सोसायटी धारकांच्या विविध समस्यांबाबत महापालिकेच्या प्रशासनाकड आठ वर्षापासून पाठपुरावा करत आहेत. यामध्ये अनेक मागण्या सोडविण्याची मागणी होत आहे. तसेच पाठपुरावा आणि संघर्ष करत आहोत. सध्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडून समस्या सोडविल्या जातील आणि पिंपरी चिंचवड शहरातील सोसायटीधारकांना न्याय मिळेल, अशी आमची अपेक्षा आहे.
संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली- मोशी -पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.