breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड स्वतंत्र आयुक्तालयाची तीन वर्ष : “पाचवी” पूजायला “सटवाई”ची २५ वर्षानंतरही प्रतिक्षा!

– शहरासाठी स्वतंत्र उपायुक्त ते आयुक्तालय प्रवास

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेस १५ ऑगस्ट २०२१ ला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. या तीन वर्षात राज्यातील सत्तांतर होतानाच आयुक्तालातील सत्तांतर ही झाले. मात्र या सत्तांतराचा फायदा नागरिकांना कितपत झाला हा प्रश्न तीन वर्षानंतरही अनुत्तरीतच आहे. मनुष्यबळ, वाहने, निधी, इमारती हे नव्या आयुक्तालयाला पुरेसे प्रमाणात मिळणे अद्याप बाकी आहे. शहरासाठी स्वतंत्र आयुक्तालय किंबहुना स्वतंत्र वरिष्ठ पोलिस अधिकारी हवा यासाठी अनेक वर्ष तत्कालीन स्थानिक नेत्यांनी पाठपुरावा केला होता. पण जसं जसे शहराला स्वतंत्र अधिकारी मिळत गेले; तसं तसे याच नेत्यांचा पोलिसांच्या कामकाजातील हस्तक्षेप कमी कमी होत गेला असून, हाच काय तो नागरिकांसाठी झालेला फायदा असे आज काही जणांचे मत आहे. मात्र, हे मत म्हणजे सत्तांतरासारखेच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

– रोहित आठवले, पत्रकार, पिंपरी-चिंचवड.

शहराकरीता १९९६ मध्ये सुरू झालेले स्वतंत्र सहाय्यक आयुक्त व उपायुक्तालय ते आजचे स्वतंत्र पोलिस आयुक्तालय हा २५ वर्षांचा इतिहास पाहता “पाचवी” पूजायला “सटवाई” ची अजून काही वर्ष प्रतिक्षा करावी लागेल असेच दिसते.

कामगारनगरी-औद्योगिकनगरी पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र वरिष्ठ अधिकारी असावा ही मागणी तशी खूप आधी पासून होत राहिली आहे. शहरासाठी १९८२ ला महानगरपालिका होऊन देखील शहरातील पोलिसांचा कारभार खडकी (एसीपी) आणि पुणे शहर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांकडून (डीसीपी) हाकला जात होता.

स्थानिकांनी १९८२ ते १९९५ या कालावधीत केलेल्या पाठपुराव्याला यश येत १७ फेब्रुवारी १९९६ मध्ये पिंपरी चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस उपायुक्त (डीसीपी) म्हणून चंद्रकांत उघडे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) म्हणून के. एन. पाटील यांची नेमणूक केली गेली. तत्कालीन पुणे शहर पोलिस आयुक्त ए. के. अगरवाल यांनी पुढाकार घेत ही दोन पद निर्मिती शासनाकडून करून घेतली होती.

पिंपरी, भोसरी व निगडी या तीन पोलिस ठाण्याचा परिसर म्हणून पिंपरी चिंचवडकडे त्यावेळेस पाहिले जात होते. स्वतंत्र वरिष्ठ अधिकारी मिळाल्यानंतर चिंचवड, सांगवी, हिंजवडी, भोसरी एमआयडीसी ही पोलिस ठाणी झाली. सध्या हाच आकडा पंधराच्या पुढे गेला आहे. त्यानंतर आता थेट तीन वर्षातच आयुक्तालयाचे कार्यक्षेत्र विस्तारण्याचाही (गावे समाविष्ट) विचार सुरू झाला आहे.

२८ मे २०१८ ला पिंपरी चिंचवड स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाचा अध्यादेश शासनाने काढला होता. त्यात ठरवून दिलेल्या तीन टप्प्यातील पद निर्मिती, साधन सामुग्री, वाहने, निधी हे सगळे आजही पूर्ण क्षमतेने मिळालेले नाही. आयुक्तालयाची ध्येयपूर्ती कागदोपत्रीच राहिली. त्यामुळे मागील तीन वर्षात तिघाही पोलिस आयुक्तांना यासाठी भरपूर पाठपुरावा करावा लागला; पण त्याला म्हणावे तेवढं यश आले नाही. एकीकडे हे सगळे असताना विस्तारीकरण हा मुद्दा का रेटला जातोय हे स्पष्ट होत नसताना, कार्यक्षेत्र विस्तारण्यामागे मावळातील राजकीय गणिते बदलण्याचा प्रयत्न तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, भोसरी एमआयडीसी, दिघी, सांगवी, वाकड, चिखली या पोलिस ठाण्यांसह आळंदी, चाकण आणि हिंजवडी, देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी ही पोलिस ठाणी आहेत. नवी पोलिस ठाणी सुरू होताना महापालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत हद्दीतील अनुक्रमे रावेत, चाकण म्हाळुंगे,

शिरगाव पोलिस ठाण्यासाठी विस्तारीकरण (विभाजन) झाले आहे.

शहराला फेब्रुवारी १९९६ मध्ये मिळालेले स्वतंत्र सहाय्यक आयुक्त व उपायुक्त यांचा कारभार ३० सप्टेंबर १९९६ पासून महापालिकेच्या सध्याच्या “क प्रभाग” कार्यालयातून सुरू झाला होता. तो चार-पाच वर्षांनी महापालिकेने दिलेल्या नव्या जागेत स्थलांतरित होऊन १४ ऑगस्ट २०१८ पर्यंत सुरू होता. चौकी, तपास पथक, वाहतूक विभागासाठी आणि आयुक्तालयासाठी अद्याप पुरेशी जागा मिळालेली नाही.

१५ ऑगस्ट २०१८ ला आयुक्तालय स्वतंत्र झाले; मात्र १९९६ ते २०२१ या २५ वर्षानंतरही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जागांवरच पोलिस विभागाला अवलंबून राहावे लागत आहे. ऑटो क्लस्टर मधून सुरू झालेले पोलिस आयुक्तालय महापालिकेच्या जुन्या शाळेच्या इमारतीतून प्रेमलोक पार्क येथे सध्या अपुऱ्या जागेत सुरू आहे. आत्ताच्या कार्यक्षेत्रातील पोलिसांना आवश्यक साधने मिळत नसताना विस्तारीकरणाची घाई नेमकी कोणासाठी हे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने चर्चिले गेले पाहिजे.

शहरासाठी १९९६ मध्ये स्वतंत्र सहाय्यक आयुक्त व उपायुक्तालय ते सध्याचे स्वतंत्र आयुक्तालय या २५ वर्षांच्या काळात किती गुन्हे वाढले आणि त्यावर अंकुश मिळविण्यात कितपत यश मिळाले याची आकडेवारी चक्रावून टाकणारी आहे. मात्र “लोकसंख्या वाढली आणि गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले, म्हणून गुन्हेगारी वाढली असे दिसते” हे चपखल उत्तर प्रत्येक वेळी अधिकाऱ्यांकडून दिले गेले आहे. गुन्हे रोखणे असो किंवा कायदा सुव्यवस्था राखणे असो यासाठी आवश्यक गरजांसाठी पोलिसांनाच झगडा द्यावा लागत असल्याने त्याचा काही प्रमाणात का होईना परिणाम कार्यक्षमतेवर होताना दिसून येतोय.

याच २५ वर्षात बॉम्ब बनविणारे, नक्षलवादाला खतपाणी घालणारे संशयित, देशातील मोठ मोठ्या साखळी बॉम्ब स्फोटात सहभाग असणारे संशयित, अंडरवर्ल्ड कनेक्ट असणारे आणि स्थानिक टोळ्या, स्ट्रीट क्राईम, खून, दरोडे यातील आरोपी हे पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या भागात पकडले गेले आहेत.

शहर आणि आसपासच्या परिसरात पोलिसिंग वाढावे, कायदा सुव्यस्था अबाधित राहावी, नागरिकांना जलद प्रतिसाद (मदत) मिळावा यासाठी स्वतंत्र आयुक्तालय केल्याचे राज्यकर्ते सांगतात. त्यामुळे प्रथम पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या जोडलेल्या भागातील परिसरात सक्षम पोलिसिंग मिळावे यासाठी पोलिसांना आवश्यक साधने-निधी पुरविण्याकडे लक्ष देण्याची गरज असून, तूर्तास तरी विस्तारीकरणाचा विचार गृहविभागाला किंबहुना राज्यकर्त्यांना बाजूला ठेवावा लागेल.

एक स्वतंत्र आयुक्तालय सुरू करताना आवश्यक असणाऱ्या बाबी कागदावर घेतल्या, पण त्याचे पुढे काय झाले हा प्रश्न विचारण्याचे धाडस आज कोणी करताना दिसत नाही. तर दुसरीकडे “आयुक्तालय सुरू करून दिले, आता तुम्ही तुमचे बघा” असाच काहीसा पवित्रा राज्यस्तरीय नेत्यांचा मागील तीन वर्षात पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहर पोलिसांना मनुष्यबळ, वाहने, निधी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हक्काची जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासन दरबारी स्थानिक नेत्यांसह अति वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रयत्न होणे आवश्यक आहेत.

एमआयडीसी, कामगारनगरी ते आजची स्मार्ट सिटी असा शहराचा प्रवास राहिला आहे. या प्रवासात शहर विकसित होत गेले. पण पोलिसांचे ही काही प्रश्न आहेत हा विचार शासनाकडून म्हणावा तेवढा झालेला दिसत नाही. माझ्या परिसरात (प्रभागात – मतदारसंघांत) एक चौकी उभारा, असे सांगण्यासाठी अनेक लोकप्रतिनिधी आयुक्तांची भेट घेत असतात. मात्र, पोलिस वसाहतीतील प्रश्न सोडविण्यासाठी, नवीन वसाहती बांधण्यासाठी, पोलिसांना वाहने, निधी मिळवून देण्यासाठी, नवीन कर्मचारी भरती प्रक्रिया राबविण्यासाठी हेच नेते सध्या पुढाकार घेताना दिसत नाहीत.

स्वातंत्र्यदिनी स्वतंत्र आयुक्तालय सुरू करण्यात आले. पण खरच स्वतंत्रतेचे स्वातंत्र्य पिंपरी चिंचवडकरांना मिळाले का याचा अभ्यास करण्याची आज गरज आहे.

हवा तसा वागणारा तो आपला

तीन वर्षांच्या कालावधीत शहराला तीन आयुक्त लाभले. पहिला चांगला की दुसरा असा विचार करणारा एक गट असताना दुसरा गट उगवत्या सूर्याला नमस्कार म्हणून दिवस ढकलत आहे. वास्तवात तिन्ही अधिकारी आपापल्या जागेवर सक्षम आणि ध्येय समोर ठेवून शहरात आले. मात्र, आपल्याला हवा तसा वागणारा चांगला आणि तसे न वागणारा वाईट अशी ढोबळ समाजमनं सगळीकडे असताना त्याला पोलिस खाते तरी कसे अपवाद राहील. त्यामुळे पहिल्या दोघांसह आत्ताच्या आयुक्तांना काहीजण वाईट ठरवताना दिसत आहेत

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button