breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारणसंपादकीयसंपादकीय विभाग

पिंपरी-चिंचवड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महापालिका प्रशासनाला ‘बुस्टर’

महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांना कौतुकाची थाप : महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणखी जलदगतीने मार्गी लावण्याचे निर्देश

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी अल्पावधीत विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावले. ‘‘वेस्ट टू एनर्जी’’ सारख्या प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतूक केले. विकासकामांच्या बाबतीत प्रशासनाने कोणतही हयगय करु नये. राज्य शासनाकडे कोणताही प्रस्ताव प्रलंबित असेल, तर मुंबईत मी आहे… असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका प्रशासनाला दिला. त्यामुळे प्रशासकीय कामकाजाला आणखी ‘बुस्टर’ मिळाला आहे. 

शिवसेना-भाजपा महायुतीमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार शुक्रवारी पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवडचा दौरा केला. त्याचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जंगी स्वागत केले. तसेच, शहरातील विविध विकासकामांबाबत त्यांनी महापालिका भवनमध्ये बैठक घेतली. 

यावेळी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर योगेश बहल, संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, महिला शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील भाजपाची ‘कोंडी’ होईल. महापालिका प्रशासनावर ‘कंट्रोल’ केला जाईल. त्यामुळे प्रशासनाची आता खैर नाही… अशा प्रकारची मिथके गेल्या काही दिवसांपासून शहराच्या राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात रुजवली जात होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या सर्व मिथकांना छेद दिला. 

अजित पवार यांनी सुमारे अडीच तास शहरातील विविध मुद्यांवर बैठकीत चर्चा केली. यामध्ये वेस्ट टू एनर्जी, बायोमायनिंग, प्रधानमंत्री आवास योजना, प्रस्तावित पिंपरी-चिंचवड क्लब, ललित कला भवन अशा विविध मुद्यांवर सकारात्मक चर्चा केली. विशेष म्हणजे, ‘‘आयुक्त शेखर सिंह आणि मी सातारामध्ये जिल्हाधिकारी असताना एकत्रितपणे काम केले आहे. अल्पावधित सिंह यांनी शहरातील मोठे प्रकल्प मार्गी लावले आहेत. आंद्रा-भामा आसखेडमधील पाणी मिळण्याबाबत प्रशासनाने चांगले काम केले..’’ अशा शब्दांत आयुक्त आणि प्रशासनाची पाठ थोपाटली. तसेच, अजित पवार यांचा एकत्रित मूड पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचे संदर्भ दिला.

महापालिका प्रशासनात ‘पॉझिटिव्ह’ वातावरण… 

अजित पवार म्हणजे अत्यंत शिस्तबद्ध आणि स्पष्टवक्ता नेता… अशी ओळख आहे. राज्यातील सत्तेत सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक नियोजित केली. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चांगलाच तणाव होता. कारण, भाजपाच्या स्थानिक नेत्यांची कोंडी करण्यासाठी  अजित पवार प्रशासनाचे ‘नाक दाबवतील’ असा दावा केला जात होता. मात्र, अजित पवार यांनी कोणताही दबाव निर्माण न करता अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात बैठक केली. अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देत प्रस्तावित प्रकल्प मार्गी लावण्याबाबत प्रोत्साहन दिले. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर ‘पॉझिटिव्ह’ वातावरण निर्माण झाले आहे. 

आता राजकारण विकासाच्या मुद्यावर…

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची सत्ता होती. २०१७ मध्ये भाजपाने सत्ता खेचली. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा असा संघर्ष शिगेला पोहोचला होता. मात्र,‘‘अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार’’ अशी शहरातील स्थिती आहे. त्यामुळे अजित पवार यांनी भाजपाशी जुळवून घेतल्यामुळे कुरघोड्यांऐवजी आता विकासाच्या मुद्यांवर राजकारण होईल, असेच संकेत अजित पवार यांनी आजच्या दौऱ्यात दिले आहेत. शहरातील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपाविरोधात टीकात्मक पवित्रा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजित पवार यांनी त्याकडे कानाडोळा करीत प्रशासनाला ताकद देवून विकासकामे मार्गी लावण्याला प्राधान्य दिल्याचे पहायला मिळाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button