पिंपरी / चिंचवडपुणे

पिंपरी चिंचवड मधील पोलीस शिपायाने सात जणांसोबत मिळून केले एका व्यक्तीचे अपहरण

पोलीस शिपायासह आठ जणांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाने त्याच्या साथीदारांसोबत मिळून एका व्यक्तीचे अपहरण केले. संबंधित पोलीस पुणे पोलीस दलात सायबर विभागात कार्यरत असताना त्याला माहिती मिळाली की, एका व्यक्तीकडे मोठ्या प्रमाणात क्रिप्टो करन्सी आहे. जर त्या व्यक्तीचे अपहरण केले तर मोठ्या प्रमाणात क्रिप्टो करन्सी व पैसे मिळू शकतात, त्यामुळे त्याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून एका व्यक्तीचे अपहरण केले. मात्र वाकड पोलिसांनी अपहरणाचा मास्तरमाइंड असलेल्या पोलिसाला सापळा लावून बेड्या ठोकल्या.

दिलीप तुकाराम खंदारे (रा. भोसरी, पुणे. मुळगाव मु.पो. कोनाटी, ता. सिंदखेड राजा, जि. बुलढाणा) असे अटक केलेल्या मास्तर माईंड आरोपी पोलीस शिपायाचे नाव आहे. त्याच्यासह सुनिल राम शिंदे (रा. खारदांडा पश्चिम, मुंबई), वसंत श्यामराव चव्हाण (रा. नालासोपारा पुर्व, मुंबई), फ्रान्सिस टिमोटी डिसूझा (रा. कल्याण (पश्चिम) जि. ठाणे), मयुर महेंद्र शिर्के (रा. खार पश्चिम, मुंबई), प्रदिप काशिनाथ काटे (रा. दापोडी, पुणे), शिरीष चंद्रकांत खोत (रा. उलवे, नवी मुंबई), संजय ऊर्फ निकी राजेश बंसल (रा. उलवे, नवी मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे.

आरोपींनी विनय सुंदरराव नाईक (रा. ताथवडे) यांचे 14 जानेवारी रोजी ताथवडे येथील एका हॉटेलमधून अपहरण केले होते. याप्रकरणी रफिक अल्लाउद्दीन सय्यद (वय 38) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जानेवारी रोजी नाईक हे ताथवडे येथील एका हॉटेलमध्ये असताना त्यांचे सात ते आठ अनोळखी इसमांनी अपहरण केले. याबाबत नाईक यांचे मित्र सय्यद यांनी वाकड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत दोन पथके तयार केली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज गोळा करत तांत्रिक विश्लेषण सुरु केले. दरम्यान पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण आरोपींना लागली. त्यांनी नाईक यांना वाकड भागात सोडले आणि आरोपी पळून गेले. आरोपींनी बिट कॉइन व आठ लाख रुपयांची मागणी केल्याचे नाईक यांनी पोलिसांना सांगितले.

वाकड पोलिसांनी आरोपींचा माग काढत मुंबई गाठली. तिथून चार जणांना ताब्यात घेत त्यांनी अपहरणाची वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली. अटक केलेल्या आरोपींनी प्रदीप काटे आणि दिलीप खंदारे यांच्या सांगण्यावरून राजेश बंसल आणि शिरीष खोत यांच्यासोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. नाईक यांचे अपहरण करून त्यांना अलिबाग येथील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवले आणि त्यांच्याकडे आठ लाख रुपयांची मागणी केली. अन्य तिघांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा मास्टरमाइंड दिलीप खंदारे असल्याचे आरोपींनी सांगितले.

दिलीप खंदारे हा पिंपरी चिंचवड पोलीस दलात कार्यरत असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी खंदारे याला तांत्रिक विश्लेषण करून भोसरी येथून सापळा लावून ताब्यात घेतले. खंदारे याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून हा गुन्हा सुनियोजितपणे कट रचून केल्याचे कबुल केले. पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल तपास करीत आहेत.

पोलीस शिपाई दिलीप तुकाराम खंदारे हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथील पोलीस मुख्यालयात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहे. सध्या तो कर्तव्यावर गैरहजर होता. तो पूर्वी पुणे शहर पोलीस दलात कार्यरत होता. तिथे तो सायबर विभागात काम करत असताना त्याने सेवाअंतर्गत ऑफीस ऑटोमेशन, सायबर गुन्हे प्रणाली, एडव्हान्स सायबर क्राईम इन्व्हेस्टीगेशन टेक्नोलॉजी, बेसीक ऑफ हार्डवेअर अॅण्ड नेटवर्क इंन्फॉरमेशन, मोबाईल फॉरेन्सीक असे कोर्स केले आहेत. तो सायबर क्राईम विभाग पुणे शहर येथे नेमणुकीस असताना त्याला विनय सुंदरराव नाईक यांच्याकडे एकूण 300 कोटी रुपयांची बिट कॉईन ही क्रिप्टो करन्सी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्याने विनय नाईक यांचे अपहरण करून पैसे उकलण्याचा डाव आखला.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे एक) संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे दोन) रामचंद्र घाडगे, सहाय्यक निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक निरीक्षक अभिजीत जाधव, उपनिरीक्षक गणेश तोरगल, सहाय्यक फौजदार बिभीषण कन्हेरकर,  बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस कर्मचारी बापुसाहेब धुमाळ, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, दिपक साबळे, बंदु गिरे, अतिश जाधव, प्रमोद कदम, अतिक शेख, प्रशांत गिलबीले, विक्रांत चव्हाण, कल्पेश पाटील, कौंतेय खराडे, अजय फल्ले, नुतन कोंडे यांच्या पथकाने केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button