ताज्या घडामोडीपुणे

पुणे मेट्रोचा विस्तार, स्वारगेट-कात्रज भुयारी मार्गाला राज्य सरकारची मान्यता

 पुणे | शहरातील स्वारगेटपर्यंतच्या मेट्रो मार्गाचा कात्रजपर्यंत विस्तार करण्याच्या महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) प्रस्तावावर राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यतेची मोहोर उमटवली. या साडेपाच किमीच्या मार्गिकेसाठी तीन हजार ६६८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पिंपरी-चिंचवड ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज या दोन्ही विस्तारित मार्गांना राज्य सरकारने मान्यता दिल्याने आता केंद्र सरकारकडून त्याला लवकर मान्यता मिळाल्यास पुणेकरांना दिलासा मिळू शकणार आहे.

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेचा विस्तार निगडी आणि कात्रजपर्यंत करण्याची मागणी गेल्या चार वर्षांपासून केली जात होती. पिंपरी ते निगडीचा प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी प्रलंबित आहे. स्वारगेट ते कात्रज दरम्यान भुयारी मेट्रो मार्गच करावा लागणार असल्याने त्याच्या खर्चावरून हा प्रस्ताव राज्य सरकारच्या स्तरावर रखडला होता. राज्य सरकार आणि पुणे महापालिका या दोघांनीही केंद्र सरकारने कमी केलेला आर्थिक हिस्सा भरून देण्याची जबाबदारी स्वीकारल्याने राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी त्याला मान्यता दिली.

या प्रकल्पाच्या तीन हजार ६६८ कोटी रुपयांच्या खर्चापैकी सर्वाधिक ८९१ कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार आहे. पुणे महापालिकेला ६५५ कोटी रुपये द्यावे लागणार असून, केंद्र सरकारकडून तीनशे कोटी रुपयांचे अनुदान मिळावे, अशी विनंती केली जाणार असल्याचे नगरविकास विभागाने स्पष्ट केले आहे. उर्वरित १८०० कोटी रुपयांचा खर्च वित्तीय संस्थांकडून उभारण्यात येणार असून, त्याचा कोणताही भार राज्य सरकारवर राहणार नाही, या अटीवर या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गिकेवर गुलटेकडी, मार्केट यार्ड, पद्मावती, बिबवेवाडी, धनकवडी, बालाजीनगर, कात्रज, आंबेगाव ही महत्त्वाची ठिकाणे आहेत. या परिसरात वाहतुकीची समस्या भीषण आहे. शहरातील सर्वाधिक रस्ते अपघात होणाऱ्या भागामध्ये कात्रज परिसराचा क्रमांक वरचा आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी टळून रस्त्यावरील अपघात, प्रदूषण, इंधन खर्च बचत आणि प्रवास कालावधीत बचत होण्याची अपेक्षा आहे.

आता केंद्राकडे नजर

पिंपरी-निगडी मेट्रोच्या मार्गाच्या विस्तार राज्य सरकारने यापूर्वीच मान्यता दिलेली आहे. तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी रखडला आहे. आता स्वारगेट ते कात्रजच्या विस्ताराला राज्य सरकारने मान्यता दिल्याने, या मार्गाचाही प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे. त्यामुळे आता या विस्तारासाठी केंद्र सरकारने लवकर मान्यता दिल्यास दोन्ही मार्गांचे पुढील काम वेळेत सुरू होऊ शकणार आहे.

स्वारगेट-कात्रज मेट्रो विस्ताराचा आढावा

स्वारगेट ते कात्रज : ५.५ किलोमीटर (संपूर्ण भुयारी मार्ग)

खर्च : ३६६८ कोटी रुपये

स्टेशन : तीन (मार्केट यार्ड, पद्मावती, कात्रज)

पिंपरी ते स्वारगेट या मेट्रो मार्गिकेच्या कात्रजपर्यंतच्या विस्ताराला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. स्वारगेट ते कात्रज आणि पिंपरी ते निगडी या दोन्ही विस्ताराला केंद्र सरकारकडून लवकरच मान्यता मिळेल, अशी अपेक्षा आहे.

– अतुल गाडगीळ, संचालक, प्रकल्प, महामेट्रो

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button