TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल

नाशिक: नाशिकमधील शिवसेनेच्या दोन आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभाग घेतल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक फेरबदल केले आहेत. यात आमदार सुहास कांदे यांची जिल्हाप्रमुखपदावरून गच्छंती झाली आहे. त्यांच्याकडील जबाबदारी आता गणेश धात्रक यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्याकडील दिंडोरी लोकसभा सहसंपर्कपद काढून घेत ते पद माजी जिल्हाप्रमुख जयंत दिंडे यांच्याकडे देऊन त्यांची संघटनेत बढती करण्यात आली आहे. युवासेनेमध्ये कार्यरत असलेले कुणाल दराडे यांनाही निफाड, येवला, चांदवड या तीन मतदारसंघाच्या जिल्हाप्रमुखपदी बढती देण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेतील ४० आमदारांचा वेगळ्या गटाला हाताशी घेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. दुसरीकडे, शिंदे यांनी बंड करण्यासोबतच पक्ष संघटनेवरही आपला दावा ठोकला आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक फेरबदल सुरू केले आहेत. नाशिक जिल्ह्यातून नांदगावचे आमदार सुहास कांदे आणि मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे यांनी शिवसेनेची साथ सोडत शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात निष्ठावतांना चाल देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

आमदार कांदे यांच्याकडे नांदगाव, मालेगाव बाह्य आणि मालेगाव मध्य या तीन विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुखपद होते. ते पद आता मनमाडचे माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांच्याकडे सोपवित कांदेंपुढे तगडे आव्हान उभे करण्यास शिवसेनेने सुरुवात केली आहे. आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून कामगिरी दाखविण्याचे आव्हान या पदाधिकाऱ्यांपुढे असेल.

चौधरी यांच्या कार्यक्षेत्रात घट

जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांचे कार्यक्षेत्र आता कमी करण्यात आले आहे. त्यांच्याकडे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी असेल. तर माजी जिल्हाप्रमुख जयंत दिंडे यांच्याकडे दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुखपदाची धुरा सोपवून उद्धव ठाकरेंनी त्यांना बढती दिली आहे. सोबत आमदार नरेंद्र दराडे यांचे पुत्र व युवासेनेचे पदाधिकारी कुणाल दराडे यांच्याकडे निफाड, येवला, चांदवड या तीन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी देत त्यांनाही बढती देण्यात आली आहे. सुनील पाटील यांच्याकडे दिंडोरी, कळवण व बागलाण या तीन विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुखपद कायम ठेवण्यात आले आहे.

आमदार झाल्यामुळे पक्षाचे काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे यापूर्वीच मी जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. माझ्या हकालपट्टीचा प्रश्न येतच नाही. विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना म्हणून आमच्याच गटाला मान्यता दिली आहे. त्यामुळे संजय राऊतांना हकालपट्टी करण्याचे अधिकार नाहीत.

– सुहास कांदे,

आमदार, नांदगाव

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार जिल्ह्यातील संघटनेत फेरबदल करण्यात आले आहेत. सुहास कांदे यांची जिल्हाप्रमुखपदावरून हकालपट्टी केली असून त्यांच्याजागी गणेश धात्रक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जयंत दिंडे यांच्याकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी असेल.

– भाऊसाहेब चौधरी,

संपर्कप्रमुख, नाशिक

शिवसेनेचे नवे पदाधिकारी

० जयंत दिंडे : संपर्कप्रमुख – दिंडोरी लोकसभा

० अल्ताफ खान : सहसंपर्कप्रमुख – दिंडोरी लोकसभा

० गणेश धात्रक : जिल्हाप्रमुख – नांदगाव, मालेगाव मध्य व बाह्य विधानसभा

० कुणाल दराडे : जिल्हाप्रमुख – निफाड, येवला, चांदवड विधानसभा

० सुनील पाटील : जिल्हाप्रमुख – दिंडोरी, कळवण, बागलाण विधानसभा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button