breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यात सायटोमेगालो विषाणूमुळे एकाचा मृत्यू

जळगाव – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज हजारो नवे कोरोनाग्रस्त आढळत आहेत. त्यातच आता जळगाव जिल्ह्यात ‘सायटोमेगालो’ विषाणूची लागण झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अमळनेरच्या नितीन नंदलाल परदेशी (33) या तरुणाला कोरोनानंतर सायटोमेगालो या विषाणूची लागण झाली होती. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, सायटोमेगालो विषाणूमुळे दगावलेला जळगाव जिल्ह्यातील हा पहिलाच रुग्ण असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सायटोमेगालो हा विषाणू नवा नाही. हा विषाणू अनेकदा सदृढ व्यक्तीच्या शरिरात निष्क्रीय अवस्थेत असू शकतो. मात्र रुग्णाची रोगप्रतिकार क्षमता कमी झाली की, तोदेखील ॲक्टिव्ह होतो. यात रुग्णाला अंगावर पुरळ येणे, ताप येणे, ऑक्सिजन पातळी कमी होणे, यासारखी लक्षणे दिसून येतात. तसेच शरीराच्या कोणत्याही भागात इन्फेक्शन होऊ शकते, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन परदेशी या तरुणाचा कोरोना अहवाल काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याने अमळनेरमध्ये कोरोनावर उपचार घेतले होते. कोरोनावर मात करून तो घरीदेखील परतला होता. मात्र त्यानंतर पुन्हा त्याला ताप आला. मग त्याची ऑक्सिजनची पातळी खालावल्यामुळे त्याला जळगावच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याची प्रकृती अधिकच खालावत गेल्याने त्याला व्हेंटिलेटरची गरज भासली, त्यामुळे त्याला ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. याठिकाणी त्याच्यावर 25 दिवस उपचार सुरू होते. मात्र त्याची ऑक्सिजन पातळी प्रचंड घसरत होती. त्यातच त्याच्या एका डोळ्याची दृष्टीही गेली होती. त्यानंतर त्याला सायटोमेगालो विषाणूशी संबधित औषधे देण्यात येऊ लागली. मात्र प्रकृती बिघडतच गेल्याने उपचारादरम्यान सोमवारी रात्री उशिरा त्याची प्राणज्योत मालवली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button