ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मशिदीवरील भोंगे उतरवणार नाही, मंदिरातील घंटानाद थांबवणार नाही, जालन्यातील ‘त्या’ गावाचा मोठा निर्णय

जालना| मंदिरातील घंटानाद आणि मशिदीवरील भोंगे हा आमच्या दिनक्रमाचा अविभाज्य भाग असल्याने ते उतरवले जाणार नाहीत. बदनापूर तालुक्यातील ढासला येथील गावकऱ्यांनी सामाजिक सलोखा राखत ग्रामसभेत हा मोठा निर्णय घेतला आहे. मशिदीवरील भोंग्याचा आम्हा ग्रामस्थांना कुठलाच त्रास नाही. अजानमुळे लोक आपापली दिनचर्या सुरु करतात. कुणी काहीही म्हटले, तरी आम्ही आमच्या गावातील मशिदीवरील भोंगा काढणार नाही. जातीयवादाला थारा देणार नाही, असा एकमुखी ठराव जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील ढासला गावाच्या ग्रामसभेत घेण्यात आला.

अजानच्या वेळेनुसार गावातील सर्व समाजातील लोकांची दिनचर्या चालते. सकाळी अजान ऐकू येताच सर्व अबालवृद्ध जागे होऊन आपापल्या दैनंदिन कामास सुरुवात करतात. दुपारी दीड वाजता अजान ऐकून शेतातील काम करणारी मंडळी जेवणासाठी थांबतात. पुन्हा सायंकाळी पाच वाजेच्या नमाजनंतर मजुरांना कामावरुन सुट्टी दिली जाते. ७ च्या नमाजनंतर जेवण केलं जातं. रात्री साडे आठच्या नमाजनंतर ग्रामस्थ झोपतात, असे ग्रामस्थांनी सांगितले.

मशिदींचे भोगे असो किंवा मंदिरातील घंटानाद, हे ऐकत आमच्या कैक पिढ्यांची पहाट प्रसन्नचित्त होत आहे. अजान, आरती, हरिपाठ या आमच्या जीवनशैलीचा भाग झाल्या आहेत. राजकीय पोळ्या भाजण्यासाठी सध्या मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा विषय चर्चिला जात असला, तरी आम्ही मात्र कदापि भोंगे उतरवणार नाही, अशी भूमिका ढासला येथील ग्रामसभेत ग्रामस्थांनी घेतली आहे.

ढासला गावची लोकसंख्या २ हजार ५०० असून गावात १ हजार ८०० हिंदू, ४०० मुस्लिम तर ३०० ईतर समाजाचे लोक राहतात. गावात ग्रामसभा घेऊन मंदिर, मशिदीवरील भोंगा न उतवण्याचा निर्णय घेण्यात आला. मशिदीवरील भोंग्याचा आम्हाला कोणताही त्रास होत नसून सकाळच्या दिनचर्येनंतर प्रत्येकजण आपापल्या कामाला लागतो. भोंग्याचा आम्हाला कोणताही त्रास होत नाही. त्यामुळे मशिदीवरील भोंगा खाली उतरवला जाणार नाही. गावातील जातीयवादाला कोणताही थारा नाही, असं गावच्या सरपंचांनी म्हटलंय. गावकऱ्यांनी देखील मशीद आणि मंदिरावरुन भोंगा खाली उतरवून नाहक सामाजिक वातावरण खराब करणार नसल्याचं म्हटलं आहे. बाहेर काय राजकारण चालू आहे याच्याशी आम्हाला काही देणं-घेणं नसून आम्ही सर्व गावकरी सुखी समाधानी असल्याचं गावकरी सांगतात.

राज्यात एकीकडे भोंग्यावरुन राजकारण तापलेले असताना ढासला गावाने आपल्या गावातील शांतता, सामाजिक एकोपा अबाधित ठेवण्यासाठी घेतलेला हा निर्णय खरोखरच इतरांच्याही डोळ्यात अंजन घालणारा ठरेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button