Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

चाकू नाही, लेखणीने दिले बळ; हातून गुन्हा घडलेल्या मुलांचे दहावीत यश

नागपूर : गुंडांच्या टोळीने त्याच्या घरावर हल्ला केला. त्यांच्या हातात धारदार चाकू होते. आपल्या आई-वडिलाला कुणी मारत असल्याने पाहून त्याला संताप आला आणि त्याने त्यांच्याच हातातील चाकू घेऊन गुंडाच्या टोळीतील एकाचा खून केला. आई-बाबाच्या बचावासाठी त्याने शस्त्र उचलले असले तरी त्याच्या हातून गुन्हा घडला होता. बालगुन्हेगार म्हणून निरीक्षण गृहात राहत असलेल्या या मुलाने दहावीच्या परीक्षेत ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. ‘लेखणीनेच बळ दिले. आता मोठा अधिकारी बनायचे आहे’, असा मनोदय त्याने ‘मटा’शी बोलताना व्यक्त केला.

अमोल (नाव बदललेले) हा सराईत गुन्हेगार नाही. मात्र, त्याच्या हातून अनावधानाने गुन्हा घडला. पाटणकर चौकातील निरीक्षणगृहात राहून अमोलने चांगला अभ्यास केला. दहावीत घवघवीत यश मिळविले. आपल्यावर असलेला गुन्हेगाराचा शिक्का त्याला पुसून काढायचा आहे. आयुष्यात घडलेला तो भयानक प्रसंग विसरायचा आणि चांगली व्यक्ती बनायचे आहे, अशी इच्छा त्याने बोलून दाखविली.
सज्ञान होण्यापूर्वीच गुन्हा घडलेल्या अमोलसह इतर तिघांनीही दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळविले. ‘आम्ही गुन्हेगार नाही, आम्हाला शिकून खूप मोठे व्हायचे आहे’, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. नागपूर जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या अनिलच्या (नाव बदललेले) हातूनही खुनाचा गुन्हा घडला. शेतकरी आई-वडिलासाठीही हा मोठा धक्का होता. दहावी परीक्षेच्या वेळीच हा गुन्हा घडल्याने अनिल नैराश्यात गेला होता. अशा स्थितीतही योग्य समुपदेशन मिळाल्याने अनिलने चांगले गुण घेतले. जिल्ह्यातील समीरच्या (नाव बदललेले) नावावर तर दहावीच्या परीक्षेच्या काळातच बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. उत्तर प्रदेशातील स्वप्नीलच्या (नाव बदललेले) हातून बालकांच्या संस्थेत असतानाच गुन्हा घडला. त्यावर ३७७ कलम लावण्यात आले असून, तो निरीक्षणगृहात आहे. आम्हाला यातून बाहेर पडून नवी वाट शोधायची आहे, अशी मनीषा या सर्व मुलांनी बोलून दाखविली.

नैराश्येतून प्रकाशाकडे वाटचाल

हातून गुन्हा घडलेल्या या मुलांमध्ये नैराश्य येते. आपण आता काहीच करू शकत नाही, अशी नकारात्मक भावना त्यांच्या यशाच्या आड उभी राहते. त्यांना या नैराश्यातून काढण्यासाठी पाटणकर चौकातील निरीक्षणगृहातील अधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न केले. आयुष्याची काळी बाजू पुसून काढून त्यांना आता यशाचे शिखर गाठायचे असल्याचा विश्वास निरीक्षणगृहाच्या अधीक्षक नम्रता चौधरी, समुपदेशक विनोद बोरकर, काळजीवाहक गंगाधर हटवार यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button