पुणे

न्याय हक्क मिळण्यासाठी कायद्याचे शिक्षण घेणे गरजेचे : पुणे जिल्हा सत्र न्यायाधीश एस. ए. देशमुख

कस्तुरी शिक्षण संस्थेत मोफत कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन

पुणे l प्रतिनिधी

“नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांना समाजात चुकीच्या प्रवृत्तीचा सामना करावा लागतो. महिलांच्या संरक्षणासाठी अनेक कायदे आहेत. या कायद्यांच्या आधाराने या प्रवृत्ती विरोधात लढण्यासाठी शिक्षण गरजेचे आहे. कायद्याचे ज्ञान घेतले, तर असुरक्षित वातावरणातही आपल्याला संकटावर मात करता येते आणि न्याय मिळवता येतो,” असे प्रतिपादन पुणे येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. देशमुख यांनी केले. चाणाक्ष बुद्धीच्या जोरावर यशाची शिखरे गाठता येतात, असेही त्यांनी नमूद केले.

शिक्रापुर (ता. शिरुर) येथील कस्तुरी शिक्षण संस्थेच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त स्कुल ऑफ लॉ यांच्यातर्फे आयोजित मोफत कायदेविषयक सल्ला व सहाय्य केंद्राच्या उद्घाटनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून देशमुख बोलत होते. यावेळी दिवाणी न्‍यायाधीश (कनिष्‍ठ स्‍तर व फौजदारी दंडाधिकारी वर्ग-1 घोडनदी) व्ही. व्ही कुलकर्णी, सहदिवाणी न्‍यायाधीश पी .के. करवंदे, द्वितीय सहदिवाणी न्यायाधीश आर. डी. हिंगणगावकर, तृतीय सहदिवाणी न्यायाधीश के. एम. मुंढे, कस्तुरी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. पंडित पलांडे, संस्थेच्या अध्यक्षा आणि विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री पलांडे, उपाध्यक्ष डॉ. प्रतीक पलांडे, उपप्राचार्या डॉ. सपना देव आदी उपस्थित होते.

डॉ. पंडित पलांडे म्हणाले, “शिरुर तालुक्यातील विद्यार्थ्यांना वकिलीचे शिक्षण घ्यायचे असेल, तर पुणे किंवा अहमदनगरला जावे लागत होते. त्यामुळे गेली चार ते पाच वर्षे लॉ कॉलेजची मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते. दोन वर्षांपूर्वी कॉलेजला मान्यता मिळाली. कोरोनामुळे दोन वर्ष प्रवेश प्रक्रियापासून अभ्यासापर्यत सगळेच ऑनलाईन होते. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आणि कोरोनाचे सावट बऱ्यापैकी कमी झाल्याने विद्यार्थ्याशी संवाद साधण्याचा योग आला.”

डॉ. जयश्री पलांडे,  डॉ. प्रतीक पलांडे यांनी संस्थेच्या वाटचाली विषयी माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. संजय राऊत, रीना क्लिंटन यांनी केले. डॉ. सपना देव यांनी आभार मानले.

शेकडो लोकांनी घेतले मार्गदर्शन

14 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत मोफत कायदेशीर सल्ला व सहाय्य सप्ताह पार पडला. सप्ताहात सामान्य लोकांच्या अनेकविध अडचणी व कौटुंबिक कलह, घटस्फोट, कौटुंबिक हिंसाचार, तसेच लहान मुलांचे हक्क व अधिकार, मुलांकरता कौन्सिलिंग, शेती विषयक कायदे आदीसाठी कायदेशीर मदत देण्यात आली. पुण्यातील तसेच शिरूर भागातील विधिज्ञ, समुपदेशकांनी मार्गदर्शन केले, असे डॉ. सपना देव यांनी नमूद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button