breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

NCP AT THE FOREFRONT । पिंपरी-चिंचवड सलग्न  पाचपैकी ३ मतदार संघावर शरद पवार गटाचा दावा!

शरद पवार गटाच्या पक्षश्रेष्ठींकडे इच्छुकांची मोर्चेबांधणी : पिंपरी-चिंचवडमध्ये प्रस्थापितांना धक्का देण्याची तयारी 

पिंपरी । प्रतिनिधी 

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून जोरदार मुसंडी मारण्याची तयारी सुरू झाली आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी, मावळ आणि भोर-वेल्हा-मुळशी अशा पाचपैकी ३ मतदार संघात ‘तुतारी’ वाजवण्यासाठी स्वत: शरद पवार मैदानात उतरणार आहेत. तसेच उर्वरित दोन जागा महाविकास आघाडीतील मित्र पक्षाला देण्यात येतील, असे चित्र आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून वाट्याला आलेल्या १० पैकी ८ जागा शरद पवार गटाने जिंकल्या आहेत. त्यामुळे अजित पवार गटाची पिछेहाट झाली. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी सौभाग्यवती सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर बिनविरोध निवडून आणत जिल्ह्यात पक्षाचे वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजित पवार यांच्या वर्चस्वाला विधानसभेत सुरंग लावण्याची रणनिती शरद पवार गटाकडून सुरू झाली आहे. 

पुण्यातील ८ पैकी ६ जागांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवार लढवतील, असा दावा पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. त्याआधी सांगली जिल्ह्यातील सहापैकी ५ जागा शरद पवार गट लढवाणार, असा दावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. त्यानंतर राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये शरद पवार गटातील स्थानिक नेत्यांकडून उमेदवारीवर ‘क्लेम’ केला जात आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड, आणि भोसरी या तीनही मतदार संघामध्ये अजित पवार गटाच्या स्थानिक इच्छुकांनी दावा केला आहे. अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या शहरात शरद पवार गटाकडून तीनही जागा लढवण्याची तयारी आहे. शिरुर लोकसभा मतदार संघातील खासदार अमोल कोल्हे यांचा प्रचंड प्रभाव असलेला भोसरी मतदार संघ ‘तुतारी’वरच लढवणार,  असा डाॅ. कोल्हे यांचा निर्धार आहे.

पिंपरी विधानसभा मतदार संघात अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून उमेदवार देणार हे निश्चित आहे. तसेच, चिंचवडमधून शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे इच्छुक असल्याचे त्यांनी स्वत: जाहीर केले आहे. त्यामुळे शहरातील तीनही मतदार संघांवर ‘तुतारी’चे गारुड पहायला मिळणार आहे. 

मावळात मशाल अन्‌ मुळशीत हात…!

दुसरीकडे, मावळमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाची ताकद मोठी आहे. कारण, लोकसभा निवडणुकीत मावळ विधानसभा मतदार संघामध्ये अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके आणि भाजपाचे माजी मंत्री बाळा भेगडे सोबत असतानाही शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना अपेक्षीत मताधिक्य मिळालेले नाही. या मतदार संघातून ठाकरे गटाची ‘मशाल’ मैदानात उतरवण्याची तयारी सुरू आहे. तसेच, भोर- वेल्हा- मुळशी या विधानसभा मतदार संघात पिंपरी-चिंचवडला जोडून असलेल्या हिंजवडी, ताथवडे, वाकड, पुनावळे, जांबे, नेरे आदी भागांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना मिळालेली मते निर्णायक आहेत. तसेच, विद्यमान आमदार म्हणून काँग्रेसचे संग्राम थोपटे यांचा या जागेवर ‘क्लेम’ राहणार आहे. 

राज्यात शरद पवार यांच्या विचारांचे वादळ सुरू झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहर हे जुन्या बारामती लोकसभा मतदार संघात होते. शहराचे नेतृत्व शरद पवार यांनीच केले. पिंपरी-चिंचवडकरांच्या घराघरांत शरद पवारांच्या विकासाचा अजेंडा पोहोचलेला आहे. शरद पवार यांची जादू चालली आणि  लोकसभा निवडणुकीत महायुतीचे मताधिक्य घटले, ही वस्तुस्थिती आहे. आमच्या पक्षाकडे भोसरी, चिंचवड आणि पिंपरी या तीनही मतदार संघात तगडे उमेदवार आहेत. महाविकास आघाडीचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील, तो आम्हास शीरसावंद्य आहे.
तुषार कामठे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button