आज मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा! ठाणे, रायगड, पालघरला रेड अलर्ट
मुंबई – राज्यात पावसाने पुन्हा दमदार पाऊल ठेवले असून गुरुवारी मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सांगलीसह राज्याच्या विविध भागांत जोरदार पाऊस झाला. मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला असून गुरुवारी बरसलेल्या सरींनी सगळीकडे पाणीच पाणी झाले. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्येही पावसाने जोर पकडला असून, आज (१८ जून) मुंबईत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून, ठाणे, पालघर, रायगड या शेजारच्या जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. तर रत्नागिरी, सिंधुदुर्गासह कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्याबरोबर औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूर, नागपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा आणि वाशिम याठिकाणीही पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.





